न्यायव्यवस्थेत एका विचारांचे लोक आहेत, हे स्पष्ट दिसत आहे ! – खासदार संजय राऊत, शिवसेना
मुंबई – अटक टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलासे का मिळत नाहीत ? त्यांना अटकेपासून संरक्षण का मिळू नये ? विशिष्ट पक्षाच्या लोकांना संरक्षण का मिळत आहे ? ज्या परिस्थितीत अटक टाळण्याचा प्रयत्न झाला, त्यावरून एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात चालू आहे. न्यायव्यवस्थेत एका विचारांचे लोक आहेत, हे स्पष्ट दिसत आहे, असे न्यायव्यवस्थेविषयी गंभीर विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
‘विक्रांत’ या युद्धनौकेच्या दुरुस्तीसाठी जमा केलेल्या निधीमध्ये अपहार झाल्याच्या आरोपाखाली भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला; मात्र त्यांना अटकेपासून संरक्षणही दिले. याविषयी संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे प्रतिक्रिया व्यक्त केली.
राऊत पुढे म्हणाले, ‘‘आरोपीने कोणत्या परिस्थितीत जामीन मिळवला, याविषयी लोकांच्या मनात संशय आहे. घोटाळा ५८ रुपयांचा असेल किंवा ५८ कोटी रुपयांचा, अपहार हा अपहारच असतो. अपहार १०० टक्के झाला असून आरोपीला तात्पुरता जामीन मिळाला आहे. आरोपी निर्दोष सुटलेले नाहीत, ते भूमीगत झाले होते. सत्र न्यायालयाचा निकाल पाहिला, तर आरोपी निर्दोष नाहीत. त्यांची कसून चौकशी झाली पाहिजे. देशाच्या न्यायव्यवस्थेची स्थिती इतकी गंभीर झाली आहे की, आम्हाला वारंवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण येते. रामनवमीला आक्रमण घडवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होणे, ही निवडणुकांची सिद्धता आहे. यापूर्वी रामनवमीला असे झालेले आठवत नाही. हा देश पुन्हा एकदा कुणीतरी फाळणीच्या दिशेने ढकलतांना दिसत आहे.’’
काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन सन्मानाने आणि आदराने करा !
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अखंड भारताच्या विधानाविषयी संजय राऊत म्हणाले की, अखंड भारताच्या संकल्पनेचे आम्ही स्वागत करतो. कोणताही पक्ष त्याला विरोध करणार नाही. पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तान आणि यानंतर अफगाणिस्तान कह्यात घेऊन अखंड भारत निर्माण करा ! तुम्हाला कुणीही थांबवलेले नाही; परंतु त्याआधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ द्या; कारण अखंड भारताचे स्वप्न त्यांचे होते. अखंड भारत अवश्य करा; परंतु त्याआधी काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन सन्मानाने आणि आदराने होऊ द्या !