संपूर्ण देशात विजेचे मोठे संकट ! – नितीन राऊत, महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री

विजेची मागणी वाढल्याने कोळशाचा तुटवडा !
राज्यात २-३ दिवस पुरेल इतकाच कोळसा शेष !

इतक्या मोठ्या संकटाचा सामना सरकार कशा प्रकारे करणार आहे, हे जनतेलाही समजायला हवे !

नागपूर – राज्यात वीजनिर्मिती करण्यासाठी लागणार्‍या कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्य भारनियमनाच्या दिशेने निघाले आहे. राज्यातील अनेक वीजनिर्मिती केंद्रांवर २-३ दिवस कोळसा पुरेल, एवढाच साठा उपलब्ध आहे. वीजनिर्मितीमध्ये महत्त्वाच्या असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा १७-१८ दिवस पुरेल, इतकाच उपलब्ध आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी १४ एप्रिल या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.

ते पुढे म्हणाले की, संपूर्ण देशात विजेचे संकट निर्माण झाले आहे. कोरोनाचे संकट संपल्यानंतर सर्वजण कामाला लागले. त्यामुळे विजेची मागणी पुष्कळ प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी तापमानात वाढ झाली. त्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली. मागणी आणि पुरवठा यांमध्ये फरक असल्याने बाहेरून वीज घ्यावी लागत आहे. गुढीपाडव्यापासून घरगुती वीज ग्राहकांना महावितरणने दिलासा दिला आहे. वीजदर २ टक्क्यांनी अल्प करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकर वापरत असलेल्या टाटाचे वीजदर ४ टक्क्यांनी अल्प होत असून अदानी यांच्या दरात मात्र वाढ होणार आहे. बेस्टचे वीजदरही स्थिर रहाणार आहेत.