पोर्तुगिजांनी नष्ट केलेल्या गोव्यातील हिंदूंच्या मंदिरांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ

  • आक्रमणकारी पोर्तुगिजांच्या विरोधात मोहीम उघडणार्‍या भाजपच्या गोवा शासनाचे अभिनंदन ! गोव्याची मुक्तता होऊन ६० वर्षे झाली, तरी आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत, हे लज्जास्पद ! – संपादक
  • भाजप शासनाने येथपर्यंतच न थांबता आता पोर्तुगिजांच्या ‘इन्क्विझिशन’सारख्या अमानवीय अत्याचारांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आणि पाठ्यपुस्तकांतून नव्या पिढीला तो सांगण्यासाठीची मोहीम हाती घ्यावी, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १४ एप्रिल (वार्ता.) – अभिलेखागार आणि पुरातत्व संचालनालय यांनी पोर्तुगिजांनी गोव्यातील त्यांच्या क्रूर सत्ताकाळात नष्ट केलेल्या हिंदूंच्या मंदिरांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. राज्य सरकारने संचालनालयाला पुरातत्व स्थळांची सूची सिद्ध करण्यास सांगितले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाच्या वेळी पोर्तुगिजांनी नष्ट केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्वार केला जाणार असल्याची घोषणा केली होती. अभिलेखागार आणि पुरातत्व संचालनालय यांकडे पुरातन महत्त्व असलेल्या ठिकाणांची विस्तृत सूची आहे, तसेच संचालनालयाने सर्व स्थळांच्या सर्वेक्षणाचे कामही हाती घेतले आहे. राज्यात ५० स्थळांना पुरातत्वीय महत्त्व आहे, तसेच ही स्थळे अभिलेखागार आणि पुरातत्व संचालनालय यांनी अधिसूचित केली आहेत. पुरातत्व महत्त्व असलेली २१ स्थळे भारतीय पुरातत्व संचालनालयाने अधिसूचित केलेली आहेत, तसेच अनेक ऐतिहासिक महत्त्व असलेली स्थळे विखुरलेल्या स्थितीत आहेत. नष्ट केलेल्या ठिकाणांची सूची संचालनालयाकडे सध्या नाही. ती सिद्ध केली जाणार आहे.