ओणी-पाचल-अणुस्कूरा रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी १८ एप्रिलला ‘रस्ता बंद ’
|
पाचल, १३ एप्रिल (वार्ता.) – मागील वर्षी झालेल्या अतीवृष्टीमुळे ओणी -पाचल-अणुस्कूरा रस्ता वाहतुकीस अतिशय धोकादायक झाला आहे. या कामासाठी शासनाने अनुमाने साडेसात कोटी रुपयांचा निधी ३ – ४ मासांपूर्वी संमत केला आहे. यासंदर्भात पाचल परिसरातील ग्रामस्थांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांचा अनेक वेळा पाठपुरावा केला; परंतु अद्याप रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने पाचल परिसरातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे १५ एप्रिल २०२२ पर्यंत सदर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ न झाल्यास १८ एप्रिल २०२२ या दिवशी सर्वपक्षीय ‘रस्ता बंद’ आंदोलनाची चेतावणी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना दिली होती.
या निवेदनाला उत्तर देतांना कार्यकारी अभियंता, उत्तर रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभाग, रत्नागिरी यांनी ‘निविदा प्रक्रिया एप्रिलअखेर पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात येईल’, असे कळवले आहे. ‘या कामाला १ मेपासून आरंभ होईल, असे गृहीत धरले, तरी सुमारे ४० किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम १५ मेपर्यंत पूर्ण होऊ शकत नाही; कारण १५ मेनंतर डांबरीकरणाचे काम केले जात नाही.
त्यामुळे रस्त्याची आहे, तशीच स्थिती राहील’, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासाठीच येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या परिसरातील सर्वपक्षीय नागरिकांच्या बैठकीत यापूर्वी ठरल्याप्रमाणे १८ एप्रिलला ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘या आंदोलनात बहुसंख्य नागरिकांनी सहभागी व्हावे’, असे आवाहन पाचल ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. किशोर नारकर यांनी केले.
या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य श्री. आबा आडिवरेकर, पंचायत समिती सदस्य श्री. बाजी विश्वासराव, रायपाटणचे माजी सरपंच श्री. विलास गांगण, पांगरी बुद्रुकचे सरपंच श्री. अमर जाधव, करकचे सरपंच श्री. सुरेश ऐनारकर, शिवसेनेचे अफजल पाटणकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. आण्णा पाथरे, ग्रामपंचायत सदस्य श्री. विनायक सक्रे आदी मान्यवरांसह परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.