रुबी हॉल क्लिनिकची नोंदणी ६ मास रहित !
पुण्यातील किडनी प्रत्यारोपण फसवणूक प्रकरण
पुणे – कोल्हापूर येथील महिलेला दलालाच्या माध्यमातून पुण्यात आणून, पैशांचे आमीष दाखवून तिची किडनी अनोळखी रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आली होती. हे शस्त्रकर्म रुबी हॉलमध्ये झाले होते. ‘रुग्णाशी पत्नीचे नाते आहे’, असे सांगून हे अवयव प्रत्यारोपण करण्यात आले होते. या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने ५ दिवसांपूर्वी ‘रुबी हॉल क्लिनिक’ला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. अवयवदाता आणि अवयवग्राही (अवयव घेणारा) यांच्या कागदपत्रांचे काळजीपूर्वक परीक्षण न केल्याचा ठपका ठेवून रुबी हॉल क्लिनिकच्या अवयव प्रत्यारोपण केंद्राची नोंदणी पुढील ६ मास किंवा आरोग्य विभागाच्या समितीचा अंतिम अहवाल येईपर्यंत निलंबित करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. मानवी प्रत्यारोपण कायद्याच्या कलमांचे उल्लंघन केल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
रुबी हॉल क्लिनिकच्या विधी सल्लागार मंजुषा कुलकर्णी यांनी सांगितले की, आरोग्य विभागाचा आदेश आम्हाला अमान्य आहे. आदेशा विरोधात आम्ही कायदेशीर सल्लामसलत करू.