सांखळी-चोर्ला घाट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याच्या प्रकरणी २ अभियंते निलंबित
मागील ३ वर्षांच्या काळात मोठ्या रस्त्यांचे डांबरीकरण केलेल्या कामाचा दर्जा तपासणार
पणजी, १३ एप्रिल (वार्ता.) – साखळी ते चोर्ला घाट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याच्या प्रकरणी शासनाने सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांना सेवेतून निलंबित केले आहे, तसेच रस्त्याच्या कामाच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. ‘चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघेही अभियंते निलंबनाखाली रहातील’, असे आदेशात म्हटले आहे. या रस्त्याच्या कामाचे त्रयस्त संस्थेकडून ‘ऑडिट’ करून खर्च संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करावा, असेही आदेशात म्हटले आहे. त्याचप्रमाणे मागील ३ वर्षांच्या काळात ज्या मोठ्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे, त्या रस्त्यांच्या कामाचा दर्जाही तपासला जाणार आहे. काम दर्जाहीन आढळून आल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदार यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
चोर्ला घाट ते सांखळी या २७ कि.मी. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याची गंभीरपणे नोंद घेतली आहे. या कामासाठी १४ ऑगस्ट २०२० या दिवशी ‘वर्क ऑर्डर’ (काम चालू करण्याचा आदेश) देण्यात आली होती. वर्षभरात म्हणजेच १३ ऑगस्ट २०२१ पर्यंत हे काम पूर्ण करायचे होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाग २३ (आर्.) कडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हे काम हस्तांतरित करण्यासाठी ५ मासांचा अवधी लागला. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘सांखळी ते केरी या दाट लोकवस्ती असलेल्या १० कि.मी. या लांबीच्या रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम अगोदर हाती घ्यावे, असे कंत्राटदाराला बजावले होते; परंतु त्याने केरी ते चोर्ला या १७ कि.मी. घाटरस्त्याचे काम आधी हाती घेतले. बांधकाम अभियंतेही यावर मूग गिळून गप्प बसले. घाट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. हे अस्वीकारार्ह आहे.’’
गेल्या ३ वर्षांच्या काळात अनेक प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या रस्त्यांच्या कामाच्या संदर्भात सत्यशोधन करावे आणि कोणती कारवाई केली याविषयी पुढील ४५ दिवसांच्या आत मुख्यमंत्री कार्यालयाला कळवावे, असे निर्देशही सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आले आहेत.