फलकावर चुका लिहीत असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची आठवण होऊन फलकामध्ये पांडुरंगाचे अस्तित्व जाणवणे
एक दिवस मी आश्रमातील फलकावर चुका लिहीत होते. तेव्हा २ वर्षांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापून आलेल्या एका वृत्ताची मला आठवण झाली. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी लिहिले होते, ‘चुकांचा फलक, म्हणजे ‘श्री फलक’ आहे. फलकाच्या रूपात साक्षात् पांडुरंगच तिथे उभा असतो.’ दुसऱ्या दिवशी मी चुका लिहिण्यासाठी फलकाजवळ गेले. तेव्हा मला फलकामध्ये पांडुरंगाचे अस्तित्व जाणवू लागले. चुका लिहून झाल्यावर माझ्याकडून उत्स्फूर्तपणे प्रार्थना झाली, ‘हे पांडुरंगा, माझ्या या चुकांबद्दल मला क्षमा कर. या चुकांमुळे मला जे पाप लागले आहे, त्याचे क्षालन होऊ दे. चुकांना कारणीभूत असलेले माझ्यातील स्वभावदोष आणि अहं तूच नष्ट कर. भगवंता, ‘स्वभावदोष आणि अहं घालवणे’, हे मानवी क्षमतेच्या पलीकडचे आहे. तूच त्यांचे निर्मूलन करून घे.’ तेव्हा ‘पांडुरंग माझ्याकडे बघत स्मितहास्य करत आहे’, असे मला जाणवले आणि माझी भावजागृती झाली.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |