‘धिर्यो’वर कारवाई करण्यासाठी कृती योजना आखा ! – उच्च न्यायालयाचा आदेश
(धिर्यो म्हणजे बैलांची किंवा रेड्यांची झुंज)
न्यायालयाने कृतीयोजना आखण्यास सांगावे लागणे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक
पणजी, १३ एप्रिल (वार्ता.) – गोव्यात ‘धिर्यो’वर (बैलांच्या किंवा रेड्यांच्या झुंजीवर) बंदी असली, तरी आतापर्यंत ‘धिर्यो’ खेळ खेळणार्या एकाही व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली नाही. यासाठी गोव्याच्या पोलीस महासंचालकांनी ‘धिर्यो’वर कारवाई करण्यासाठी कृती योजना आखावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने दिला आहे. ‘पिपल फॉर अॅनिमल’ या प्राणीप्रेमी संघटनेने ‘धिर्यो’वर कारवाई करण्याकडे पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याच्या कारणास्तव न्यायासाठी गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा आदेश दिला.
या प्रकरणी न्यायाधीश आर्.एन्. लढ्ढा आणि ए.के. मेनन म्हणाले, ‘‘धिर्यो’ पोलीस ठाण्याच्या हद्दीत खेळला जातो आणि पोलीस याला उत्तरदायी असलेल्यांना ओळखू कसे शकत नाहीत ?’’