स्वतः काढलेल्या सुबक चित्रांच्या माध्यमांतून त्यांचे पणतू आणि सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम (वय ४ वर्षे) यांना विविध गोष्टींची शिकवण देणाऱ्या पू. (श्रीमती) राधा प्रभु !
मंगळुरू, कर्नाटक येथील सनातनच्या ४४ व्या संत पू. राधा प्रभु (वय ८४ वर्षे) यांनी त्यांचे पणतू आणि सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांच्यासाठी स्वतः काही कथा तयार केल्या आहेत. एका वहीत त्यांनी निर्जीव वस्तू, झाडे, फुले, प्राणी-पक्षी आदींची सुंदर अन् सुबक चित्रे काढली आहेत. पू. भार्गवराम यांना विविध गोष्टींचे ज्ञान व्हावे, यासाठी पू. राधा प्रभुआजी (पू. भार्गवराम यांची पणजी) या चित्रांच्या माध्यमातून अनेक स्वरचित कथा पू. भार्गवराम (त्या वेळचे (वर्ष २०१९ मधील) वय २ वर्षे) यांना समजावून सांगायच्या. यामुळे पू. भार्गवराम यांच्या मनात निसर्ग, प्राणी-पक्षी, फुले इत्यादी अनेक गोष्टींची जिज्ञासा निर्माण होऊन त्यांना अनेक विषयांचे ज्ञानही मिळू लागले. यातून ‘एक संत दुसऱ्या संतांकडे ज्ञानाचा अमूल्य ठेवा कसा सुपुर्द करतात ? आणि सुसंस्कारांचे बाळकडूही कसे देतात ?’, हे शिकायला मिळते. पू. राधा प्रभु यांनी चित्रांतून सात्त्विक आणि असात्त्विक गोष्टींविषयीची शिकवणही दिली आहे. त्यांनी काढलेल्या या चित्रांकडे पाहून भावजागृती होते आणि वही हातात घेतल्यावर ध्यान लागते.
ही चित्रे बारकाईने पाहून त्याविषयी प्रश्न विचारणाऱ्या पू. भार्गवराम यांची बुद्धीमत्ता लक्षात येते, तसेच प्रत्येक गोष्टीमागील कारण जाणून घेण्याची त्यांची जिज्ञासू वृत्तीही दिसून येते. वहीतील असात्त्विक गोष्टी आणि वस्तू यांच्या चित्रांवर त्यांनी रेघोट्या मारल्या आहेत किंवा ते चित्रच फाडून टाकले आहे.
पू. राधा प्रभु यांनी काढलेली चित्रे आणि ती पहातांना पू. भार्गवराम अन् पू. राधा प्रभु यांच्यात झालेला संवाद पुढे दिला आहे.
१. ‘सेवेप्रती कृतज्ञताभाव हवा’, हे सांगणारे खारीचे चित्र !
चित्र काढलेला दिनांक : ११.६.२०१९
पू. भार्गवराम : हे चित्र कशाचे आहे ?
पू. राधा प्रभु : हे खारीचे चित्र आहे.
पू. भार्गवराम : तिने कोणापुढे हात जोडले आहेत ?
पू. राधा प्रभु : ती श्रीरामाच्या चरणी कृतज्ञता अर्पण करत आहे.
पू. भार्गवराम : ती असे का करत आहे ?
पू. राधा प्रभु : प्रभु श्रीराम सेतू बांधत असतांना खारीने वाळू आणून टाकायची सेवा केली होती. आपल्याला सेवा दिल्याबद्दल ती श्रीरामाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहे.
२. वानराचे चित्र पाहिल्यावर त्यासंदर्भात अचूक प्रश्न विचारणारे पू. भार्गवराम ! (छायाचित्र क्र. २ पहावे)
चित्र काढलेला दिनांक : १७.६.२०१९
पू. राधा प्रभु : या वानराने सेतू बांधतांना श्रीरामाला साहाय्य केले.
पू. भार्गवराम : याने श्रीरामाला कृतज्ञता का अर्पण केली नाही ?
पू. राधा प्रभु : त्याला कदाचित कोणी शिकवले नसावे !
३. सुंदर हरिणाचे चित्र पहातांना पू. राधा प्रभु आणि पू. भार्गवराम यांनी केलेले एक नाटक अन् नाटक करतांना लक्षात आलेली पू. भार्गवराम यांची कुशाग्र बुद्धीमत्ता ! (छायाचित्र क्र. ३ पहावे)
चित्र काढलेला दिनांक : १६.६.२०१९
पू. भार्गवराम : हे कशाचे चित्र आहे, पणजी ?
पू. राधा प्रभु : हे हरीण आहे. हे पुष्कळ सुंदर आहे. त्याचे सौंदर्य बघ. त्याचे सौंदर्य बघून सीतेनेसुद्धा ‘ते हरीण मला आणून द्या’, असे श्रीरामाला सांगितले. श्रीराम धनुष्यबाण घेऊन वनात गेला. हरीण पुढे पळत होते. रामही पुढे पुढे गेला. थोड्याच वेळात ‘श्रीराम ‘हे सीते, हे लक्ष्मण’, अशी हाक मारत आहेत’, असे सीतेला ऐकू आले. ‘रामावर काही संकट आले असावे’, असा विचार करून तिने लक्ष्मणाला रामाकडे पाठवले. त्या वेळी लक्ष्मणाने एक रेषा काढली आणि ‘या रेषेच्या पुढे जायचे नाही’, असे सीतेला सांगून तो बाहेर गेला.
त्याच वेळी तेथे जवळच लपून बसलेला रावण संन्याशाच्या वेषात भिक्षा मागण्यासाठी सीतेच्या कुटीसमोर येऊन उभा राहिला. रावण लक्ष्मणाने मारलेल्या रेषेच्या पलीकडे उभा राहिला. त्याने सीतेला रेषेच्या पुढे येऊन भिक्षा देण्यास सांगितले. ‘संन्याशाला भिक्षा न दिल्यास आपल्याला पाप लागेल’, असा विचार करून सीता रेषा ओलांडून पुढे गेली आणि तिने रावणाला भिक्षा घातली. तेव्हा रावणाने तिला उचलले आणि तिला घेऊन तो लंकेला गेला.
पू. भार्गवराम : ही कथा छान आहे.
पू. राधा प्रभु : आता आपण या कथेप्रमाणे नाटक करूया ? मी रावण होते. तू सीता हो.
पू. भार्गवराम : चालेल.
पू. राधा प्रभुआजी रावण बनून आल्या आणि म्हणाल्या, ‘‘भिक्षां देहि ।’ म्हणजे ‘भिक्षा द्यावी.’’
तत्क्षणी पू. भार्गवरामने पळत पळत येऊन नाटकातील रावणाला (पू. राधा प्रभुआजींना) भिक्षा घातली आणि तो पळत जाऊन दुसरीकडे लपून बसला. त्या वेळी ‘पू. भार्गवराम सीतेसारखा साधा-सरळ वागणारा नाही, तर हुशार आहे’, हे माझ्या (पू. राधा प्रभु यांच्या) लक्षात आले.
(‘येथे पू. भार्गवराम यांनी संन्याशाला (रावणाला) भिक्षा घातली आणि ‘रावणाने आपल्याला पकडू नये’; म्हणून ते लगेच पळून गेले. येथे त्यांनी बुद्धीने रावणापासून स्वतःला वाचवण्याचा उपाय काढला.’ – संकलक)
४. सात्त्विक आणि असात्त्विक गोष्टींची ओळख करून देण्यासाठी पू. राधा प्रभु यांनी काढलेले चित्र अन् ते पहातांना पू. भार्गवराम यांनी विचारलेले अचूक प्रश्न (छायाचित्र क्र. ४ पहावे)
चित्र काढलेला दिनांक : १८.६.२०१९
चित्राचे वर्णन : या चित्रात एक कोंबडी आणि एक कुत्रा आहे. तेथे २ भांडी असून एकात दूध आणि एकात ‘कोकाकोला’ आहे अन् कोंबडी भांड्यातील दूध पीत आहे.
पू. भार्गवराम : या चित्रात काय आहे, पणजी ?
पू. राधा प्रभु : ही एक सात्त्विक कोंबडी आहे. एका भांड्यात दूध आणि दुसऱ्या भांड्यात ‘कोकाकोला’ घालून तिच्या पुढे ठेवल्यावर ती ते दूधच प्यायली.
पू. भार्गवराम : तो ‘कोकाकोला’ कुत्रा प्यायला का ?
पू. राधा प्रभु : नाही. त्यानेही प्यायला नाही.
पू. भार्गवराम : मग तो कुत्रासुद्धा सात्त्विकच आहे ना ?
पू. राधा प्रभु : फारच छान ! तू पुष्कळ बुद्धीमान आहेस !
५. सोंड वर उचलून आनंदाने अभिवादन करणारा हत्ती आणि हत्तीचे बारकाईने निरीक्षण करणारे पू. भार्गवराम !
चित्र काढलेला दिनांक : १५.६.२०१९
पू. भार्गवराम : या हत्तीने सोंड वर का उचलली आहे ?
पू. राधा प्रभु : पू. भार्गवराम यांचे स्वागत करण्यासाठी हत्तीने आनंदाने सोंड वर उचलली आहे.
पू. भार्गवराम : हा हत्ती पुष्कळ चांगला आहे ना ! याला २ डोळे आहेत. एक डोळा त्या बाजूला आहे, हो ना !
पू. राधा प्रभु : फारच छान ! (वर्ष २०१९)