आग लागल्यावर करावयाच्या प्रासंगिक आणि अग्नीप्रतिबंधक उपाययोजना

आज १४ एप्रिल २०२२ या दिवशी ‘राष्ट्रीय अग्नीशमन दिन’ आहे. त्या निमित्ताने…

आग ही दैनंदिन जीवन-व्यापारातील कधीही घडणारी घटना असली, तरी तिच्या संदर्भात नियंत्रित आणि अनियंत्रित यांमधील लक्ष्मणरेषा फार महत्त्वाची असते. एखाद्या प्रसंगी आग नियंत्रणाची लक्ष्मणरेषा ओलांडू शकते. असे झाल्यास त्यावर काय उपाययोजना करायची, याचे ज्ञान ती आग हाताळणाऱ्यांना असणे महत्त्वाचे असते. त्याविषयीच्या प्रासंगिक आणि अग्नीप्रतिबंधक उपाययोजना येथे देत आहोत.

१. प्रसंग आणि प्रासंगिक उपाययोजना

१ अ. जळणाऱ्या घरातून / वास्तूतून स्वतःची सुटका : आग लागलेली खोली किंवा माळ्यावरून बाहेर पडतांना शेवटच्या माणसाने दार केवळ ओढून घ्यावे. कुलूप लावू नये. कुलूप लावल्यास अग्नीशमन दलाला शोध आणि सहकार्य करण्यात अडथळा येतो.

१. आपत्कालीन कृती आराखड्यात नमूद केलेल्या मार्गानेच बाहेर पडा.

२. आणीबाणीच्या प्रसंगी उद्वाहनाचा (‘लिफ्ट’चा) वापर चुकूनही करू नका.

३. धूर आणि विषारी वायूंना टाळण्यासाठी खाली वाका. स्वच्छ हवा भूमीलगत असते. आवश्यकता भासल्यास भूमीवर पालथे पडा आणि हातापायांवर रांगत पुढे जा. पोटावर सरपटत पुढे होऊ नका. उष्णतेमुळे धुराचे ऊर्ध्वगमन होत असते आणि काही जड विषारी वायूंचा थर भूमीवर जमतो; म्हणून रांगतांना डोके भूमीपासून साधारण ०.५ मीटर उंचीवर धरले पाहिजे.

४. शक्य असल्यास नाक आणि तोंड ओल्या फडक्याने झाका.

५. जळक्या पायऱ्यांवरून (जिन्यावरून) किंवा खोलीतून जातांना भिंतीकडूनच चाला. भिंती इमारतीच्या मुख्य सांगाड्यावर उभारलेल्या असल्यामुळे भिंतीजवळचा भाग हा सर्वांत सुरक्षित असतो. अन्य भाग कोसळण्याची शक्यता असते.

६. अनेक माळ्यांची वास्तू (बहुमजली इमारत) असल्यास पायऱ्या हाच सुटकेचा प्रमुख मार्ग असतोे. न घाबरता, सावधपणे आणि शिस्तीत बाहेर व्हा.

७. पायऱ्यांवर आल्यावर एका बाजूनेच खाली उतरा. पायऱ्यांची दुसरी बाजू अग्नीशमन आणि साहाय्यपथकासाठी रिकामी सोडा. चुकूनही पुन्हा वर जाऊ नका.

८. वास्तूबाहेर आल्यावर अग्नीशमन दल आणि पोलीसदल यांना त्वरित घटनेविषयी कळवा.

१ आ. स्वतःलाच आग लागल्यास जिथे आहात तिथे थांबा आणि भूमीवर पडा. कपड्यांची पेटलेली बाजू भूमीलगत राहील, याची दक्षता घ्या. यामुळे ज्वाळा दडपल्या जाऊन विझतील आणि तुमचा जीव वाचू शकेल. कपड्यांना आग लागली असता घाबरून पळू नका (धावल्यामुळे आग भडकण्यास साहाय्य होते), तसेच भूमीवर गडाबडा लोळू नका.

१ इ. साथीदाराला आग लागल्यास : रग, घोंगडी, सतरंजी किंवा कोणतेही जाड कापड घेऊन जळणाऱ्याभोवती गुंडाळा. आग विझल्यावर त्याच्या अंगावरील जळके कपडे काढून टाका. तसेच योग्य प्रथमोपचार द्या.

२. स्वयंपाकघरातील आग

अ. स्वयंपाकघराची मांडणी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य अशी करा.

आ. स्वयंपाक करतांना सैल, घोळसर कपडे घालू नका, साडीचा पदर नीट खोचून घ्या.

इ. स्टोव्हवरून गरम भांडी उतरवतांना नेहमीच सांडशीचा किंवा चिमट्याचा वापर करा. या कामी टॉवेल, फडके किंवा साडीचा पदर वापरणे अत्यंत धोक्याचे असते.

ई. घरगुती वापराच्या वायूची (गॅसची) शेगडी, स्टोव्ह किंवा ओव्हन चालू असतांना घर सोडून बाहेर जाऊ नका.

उ. घरात कुणीच नसतांना किंवा झोपी जातांना मेणबत्त्या आणि तेलाचे दिवे विझवा.

ऊ. घरगुती वापराच्या वायूची शेगडी किंवा स्टोव्ह नेहमी उंचावर ठेवा. लादीवर कधीच ठेवू नका.

ए. शेगडीवर मुठीचे भांडे ठेवतांना मूठ आतल्या बाजूस ठेवा.

ऐ. लाकडी कपाट, फळ्या, पडदे, कपडे इत्यादी ज्वलनशील वस्तू शेगडी / स्टोव्ह यांपासून दूर ठेवा.

ओ. लहान मुलांना स्वयंपाकघरात खेळू देऊ नका.

औ. मायक्रोवेव्ह ओव्हन वापरतांना काळजी घ्या. ते बाह्यतः जरी गार वाटत असले, तरी आतील पदार्थांचे तापमान अधिक असू शकते. ओव्हनमधल्या पदार्थाने पेट घेतल्यास वीजपुरवठा त्वरित बंद करा आणि आग विझेपर्यंत ओव्हनचे दार उघडू नका.

अं. काडीपेटीची काडी पेटवतांना शरिरापासून लांब धरा. जळती काडी फेकण्यापूर्वी पूर्णपणे विझल्याची निश्चिती करा.

क. स्वच्छता हा आग टाळण्याच्या उपाययोजनेचा पाया आहे. ॐ

(सविस्तर विवेचनासाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘अग्नीशमन प्रशिक्षण’)


संकटकाळात  संजीवनी  ठरणारा  सनातनचा  ग्रंथ

अग्नीशमन प्रशिक्षण

  • आग लागल्याचे लक्षात आल्यावर काय करावे ?
  • अग्नीशमनाची विविध माध्यमे / पद्धती कोणत्या ?
  • स्वतःलाच आग लागल्यास काय करावे ?
  • स्टोव्हचा भडका उडाल्यास किंवा कढईतील तेलाला आग लागल्यास ती कशी विझवावी ?

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७