कॉ. पानसरे यांची हत्या नेमकी कुणी केली ? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी, यासाठी कोल्हापूर येथील न्यायालयात युक्तीवाद
कोल्हापूर, १३ एप्रिल (वार्ता.) – कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या समीर गायकवाड यांनी केली ? कि सारंग अकोलकर-विनय पवार यांनी केली ? कि सचिन अंदुरे आणि वासुदेव सूर्यवंशी यांनी केली ?, हा मुख्य प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. पोलीस जेव्हा आरोपपत्र प्रविष्ट करतात, तेव्हा त्यात ठोस गोष्टी येणे अपेक्षित असते; मात्र त्यावर सरकारी पक्षाच्या वतीने कोणत्याही प्रकारचा युक्तीवाद करण्यात आलेला नाही. अन्वेषण, पुनर्अन्वेषण आणि पुढील अन्वेषण या संदर्भात आम्ही जी सूत्रे उपस्थित केली आहेत, त्यावर सरकारी पक्षाच्या वतीने कोणतीही उत्तरे दिलेली नाही. केवळ डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे हे या प्रकरणी आरोपी आहेत; म्हणून त्यांच्यावरही खटला चालू रहाणे योग्य नाही.
त्यामुळे ‘कॉ. पानसरे हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी’, अशी मागणी आम्ही न्यायालयाकडे केली आहे. त्यावर आज युक्तीवाद पूर्ण झाला, अशी माहिती अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकारांना दिली. ही सुनावणी कोल्हापूर येथे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्यासमोर चालू असून पुढील सुनावणी २२ एप्रिल या दिवशी होणार आहे.
या संदर्भात युक्तीवाद करतांना अधिवक्ता समीर पटवर्धन म्हणाले, ‘‘कॉ. पानसरे यांची हत्या होण्यापूर्वी झालेल्या बैठकीत सचिन अंदुरे होते’, असा दावा सरकारी पक्ष करत आहे. प्रत्यक्षात सचिन अंदुरे हे हत्या प्रकरणात होते, असा एकही ठोस पुरावा सरकारी पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेला नाही. या प्रकरणातील बंदूकही प्रत्यक्षात समोर आलेली नाही. त्यामुळे सचिन अंदुरे यांची या खटल्यातून निर्दाेष मुक्तता करावी.’’
तीन दुचाकी आणि सर्वच संशयित घटनास्थळी असल्याचा विशेष सरकारी अधिवक्ता हर्षद निंबाळकर यांचा अजब दावा !
आजपर्यंत तीन वेगवेगळ्या ‘थिअरी’ मांडणाऱ्या सरकारी अधिवक्त्यांनी या प्रकरणात नवीनच ‘थिअरी’ मांडली. कॉ. पानसरे हत्या प्रकरणात समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, वासुदेव सूर्यवंशी, विनय पवार, सारंग अकोलकर, असे सर्वच संशयित आणि तीन दुचाकी घटनास्थळी होत्या, असा अजब युक्तीवाद विशेष सरकारी अधिवक्ता हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयासमोर केला.