बालसाधकांच्या सत्संगाला उशिरा पोचल्यामुळे दाराबाहेर उभे राहून भावप्रयोग केल्यावर आलेली अनुभूती
१. बालसाधकांच्या सत्संगाला उशिरा पोचल्यामुळे दाराबाहेर उभी राहिल्यावर भावजागृती होणे
‘१०.१२.२०२१ या दिवशी एका सेवेमुळे मला बालसत्संगाला जायला थोडा विलंब झाला. मी तिथे पोचले, तेव्हा कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे) भावप्रयोग घेत होती; म्हणून मी दाराच्या बाहेरच हात जोडून प्रार्थना करत उभी राहिले. तेव्हा काहीही प्रयत्न न करता आपोआपच माझा भाव जागृत होत होता आणि भावपूर्ण प्रार्थना होत होती.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून बालसत्संगात आले असल्याचे जाणवणे
मी कक्षाच्या दाराबाहेर उभी असतांना ‘मी गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) चरण घट्ट पकडले आहेत’, असे अनुभवत होते. ‘गुरुदेवांच्या चरणांची स्थापना बालसत्संगात झाली आहे. हा सत्संग म्हणजे देवाचा गाभारा असून ते सतत इथेच असतात. या सत्संगावर त्यांची अखंड कृपादृष्टी असते. ते सतत ‘या सत्संगात काय चालू आहे ?’, हे बघत असतात. ते ‘त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत होणाऱ्या बाल सत्संगातील दैवी बालकांचे बोलणे ऐकण्यासाठी आतुर असतात, तसेच या बालसत्संगासाठीही आतुर असतात’, असे मला जाणवत होते. ते स्थुलातून या सत्संगासाठी येत नाहीत, तरी ‘ते सूक्ष्मातून या सत्संगात उपस्थित असतात’, याची मला तीव्रतेने जाणीव होत होती.
३. बालसत्संगात घेतलेला भावप्रयोग आणि दाराबाहेर उभे राहून केलेला भावप्रयोग यांत साम्य जाणवल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे
‘अपाला घेत असलेला भावप्रयोग संपला’, असे लक्षात आल्यावर मी आत गेले. तेव्हा तेथे दोन्ही बालसंत (पू. भार्गवराम प्रभु आणि पू. वामन राजंदेकर) होते. ते पाहून माझे मन पुष्कळ आनंदी झाले. ‘भावप्रयोग केल्यावर काय जाणवले ?’, असे अपालाने विचारल्यावर सर्वांनी ते सांगण्यास आरंभ केला. तेव्हा ‘अपालाने घेतलेला भावप्रयोग आणि देवाने माझ्याकडून करवून घेतलेला भावप्रयोग यांत साम्य होते’, असे माझ्या लक्षात आले. याची जाणीव झाल्यावर माझा भाव जागृत होऊन मला आनंद झाला. मला गुरुदेवांविषयी कृतज्ञता वाटली.’
|