उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा पुरवठा वेळेत करा अन्यथा मोर्चा काढू ! – मंगेश तळवणेकर, अध्यक्ष, विठ्ठल-रखुमाई संघटना
|
सावंतवाडी – जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेण्यासाठी सर्वाधिक रुग्ण येत असूनही तेथे रुग्णांना औषधे, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा यांच्या कमतरतेला सामोरे जावे लागत असून त्यांचे हाल होत आहेत. १८ एप्रिलपर्यंत या सुविधांची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी विठ्ठल-रखुमाई संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रुग्णालयात सुविधांची पूर्तता न केल्यास ‘२१ एप्रिल या दिवशी तहसीलदार कार्यालयापासून प्रांताधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने गरिबांसाठी मोर्चा काढण्यात येईल’, अशीही चेतावणी त्यांनी दिली आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येथील उपजिल्हा रुग्णालयात केवळ आधुनिक वैद्य (डॉक्टर), ‘स्ट्रेचर’ आणि खाटा उपलब्ध आहेत. आवश्यक सुविधांची उणीव आहे. अपघाती, सर्पदंश झालेले आणि इतर आजारांवर उपचारांसाठी आलेल्या रुग्णांसाठी औषधे उपलब्ध नाहीत. अतीदक्षता विभागामधील वातानुकूलन यंत्र बंद आहे. शस्त्रकर्म करण्यासाठी लागणारा धागासुद्धा रुग्णालयात उपलब्ध नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेण्यासाठी सर्वाधिक रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात येतात. येथे शौचालयात पाण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारांसाठी येणार्यांची आर्थिक हानी होत आहे. यामुळे रुग्णालयात औषधे, सापाच्या विषावरील इंजेक्शने, पाणी आणि इतर सुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा मोर्चा काढण्यात येईल.