स्वर आणि राग यांचा एकमेकांशी असलेला संबंध
डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !
डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील पू. किरण फाटक हे ‘संगीत अलंकार’ असून गेल्या ३० वर्षांपासून डोंबिवली येथे ‘भारतीय संगीत विद्यालया’च्या माध्यमातून मुलांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण देत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी, तसेच अन्य संगीत कार्यक्रमांना त्यांना परीक्षक म्हणून बोलावले जाते. ते श्री स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांना स्वामी समर्थांवर विविध काव्ये आणि भक्तीपर कवने स्फुरली आहेत.
‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मौलिक मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी काही लेखांमधून केले आहे. त्यांच्या या लेखांमधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.
– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (३१.३.२०२२)
१. ‘स्वराधिष्ठित’ संगीत
‘संगीतातील प्रत्येक सूर हा संशोधनाचा एक मोठा विषय आहे’, हे आपल्या प्रतिभावंत संगीत जाणकारांनी जाणले आणि रागसंगीत निर्माण झाले असावे’, असे मला वाटते; म्हणूनच आपल्या शास्त्रीय अभिजात संगीताला ‘स्वराधिष्ठित संगीत’ म्हणत असावेत.
२. प्रत्येक स्वराचे वेगळे व्यक्तीमत्त्व असून ते जाणून घेण्यासाठी अन्य स्वरांचे साहाय्य घ्यावे लागणे
प्रत्येक सुराला एक मोठा मधुर आणि प्रकाशमान परीघ आहे; पण तपस्येविना तो दिसत नाही. तपस्या करून स्वर बघण्यासाठी एक दिव्य दृष्टी मिळवावी लागते. एखाद्या स्वराचे अनेक पाकळ्यांनी फुललेले व्यक्तीमत्त्व जाणून घेण्यासाठी आपल्याला इतर स्वरांचे साहाय्य घ्यावे लागते. इतर स्वर या स्वराची मुलाखत घेतात आणि त्यातून त्या स्वराचे अनेकपदरी व्यक्तीमत्त्व उलगडत जाते.
३. वादी, संवादी आणि अनुवादी स्वर
ज्या स्वराची मुलाखत घेतली जाते, त्या स्वराला ‘वादी’ (टीप १) किंवा ‘संवादी’ (टीप २), असे म्हणतात आणि इतर जे स्वर मुलाखत घेतात, त्या स्वरांना ‘अनुवादी’ (टीप ३), असे म्हणतात. वादी आणि संवादी हे सुखी पती-पत्नीसारखे असतात; कारण ते सुसंवादी असतात. नाचणाऱ्या गोप-गोपींमध्ये मध्यभागी उभा राहून बासरी वाजवणारा कृष्ण म्हणजे ‘वादी स्वर’. या स्वरांच्या लहरींवर स्वार होऊन इतर स्वर नाचत असतात.
|
४. भारतीय संगीतातील स्वर एकाकी न रहाता एकमेकांना धरून चालत असणे
आपल्या भारतीय संगीतात सर्व स्वर (टीप ४) एकमेकांना धरून असतात. स्वरांना एकांत पसंत नाही. आपल्या भारतीय संगीतात स्वराच्या स्वतंत्र अस्तित्वाला स्थान नाही. स्वर एकमेकांच्या हातात हात घालून नेहमी चालतात. एकमेकांच्या संगतीत / सहवासात ते जास्त आनंदी रहातात आणि श्रोत्यांचा आनंद द्विगुणित करतात. याला इंग्रजीत ‘मेलडी (Melody)’, असे म्हणतात; म्हणून आपले संगीत श्रुतिमनोहर आहे; परंतु या स्वरांना ‘अहंकार’ नाही. एखाद्या स्वराच्या कल्याणासाठी किंवा तो खुलून येण्यासाठी ते स्वतःचे उत्तुंग व्यक्तीमत्त्व बाजूला ठेवतात.
|
५. राग
राग ही संकल्पना, म्हणजे विशिष्ट स्वराची (वादी आणि संवादी) विशिष्ट रंगछटा आणि विशिष्ट स्वभाव शोधून काढण्यासाठी केलेली विशिष्ट स्वरांची केलेली सामूहिक रचना म्हणता येईल.
६. स्वरांचे महत्त्व आणि विविध रागांची निर्मिती
६ अ. ग (गंधार) : शुद्ध गंधार (ग) हा स्वर घेतला, तर तो ‘यमन’ या रागामध्ये कसा दिसतो किंवा कसा जाणवतो ? तोच ‘ग’ ‘खमाज’ या रागामध्ये कसा जाणवतो आणि तोच ‘ग’ ‘भूप’ आणि ‘बिहाग’ या रागांमध्ये कसा वाटतो ? तोच ‘ग’ ‘पूर्वी’ या रागात कसा वाटतो ? तोच ‘गौडसारंग’ या रागात कसा वाटतो ? ‘या ‘ग’चे व्यक्तीमत्त्व कसे बहुरंगी आहे ?’, हे पडताळून पहाण्यासाठी हे राग निर्माण झाले असावेत’, असे मला वाटते.
६ आ. म (मध्यम) : एक स्वर जेव्हा वेगवेगळ्या स्वरांच्या सहवासात येतो, तेव्हा तो वेगवेगळे रंग आणि गंध यांची बरसात करतो अन् ऐकणाऱ्याचे कान तृप्त करतो.
‘म’ हा स्वर अत्यंत मधुर, नाजूक आणि मार्दव असलेला; पण स्वतःची कहाणी सहजासहजी न सांगणारा, असा आहे. ‘या ‘म’ला जाणून घेण्यासाठी केदार, मालकंस, बहार, बागेश्री, भीमपलासी, मधमाद सारंग, राजेश्री, हे राग सिद्ध केले गेले असावेत’, असे मला वाटते.
६ इ. ध (धैवत) : उत्तरांगातील महत्त्वाचा स्वर म्हणजे ‘धैवत’. हा मानवी मनाला उत्साह आणि उमेद देणारा अन् कार्यप्रवृत्त करणारा, उमलणारा सूर होय. अल्हैया बिलावल, देसकार, तोडी, हमीर इत्यादी रागांतील ‘धैवत’ हा मनाला दिलासा देणारा, धीर देणारा आणि प्रकाशमान स्वर म्हणता येईल.
६ ई. सा (षड्ज) आणि प (पंचम) : ‘सा’ आणि ‘प’ हे अचल स्वर (टीप ५) समजणे सगळ्यांत महत्त्वाचे आहे. हे स्वर जर लक्षात आले नाहीत, तर पुढे जाऊ नये. या स्वरांची स्थाने समजल्याविना पुढे जाणे व्यर्थ आहे. या स्वरांत विलक्षण शक्ती आणि ऊर्जा असते. हे स्वर इतर स्वरांनाही ऊर्जा देतात. हे दोन स्वर पूर्ण १२ स्वरांच्या झाडाची मुळे आहेत. ही मुळे भक्कम पाहिजेत; म्हणून राग शिकण्याआधी मूळ स्वरांची ओळख होणे फार महत्त्वाचे आहे.
|
७. ‘राग शिकण्याआधी १० थाटांत (टीप ६) निदान ५० अलंकार किंवा पलटे (टीप ७) गाता येणे फार महत्त्वाचे आहे’, असे माझे मत आहे.
टीप ६ – राग निर्माण करणाऱ्या स्वररचनेस ‘थाट’, असे म्हणतात.
टीप ७ – विशिष्ट क्रमाने केलेल्या स्वररचनेस ‘अलंकार’किंवा ‘पलटा’, असे म्हणतात.’
– (पू.) किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (३१.५.२०२१)