बालसत्संगातील दैवी बालक आणि युवा साधक यांना श्रीकृष्ण अन् श्रीराम या रूपांत दिसणारे बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) आणि पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) !
९.१२.२०२१ ते ११.१२.२०२१ या कालावधीत झालेल्या बालसत्संगात पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) आणि पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) हे बालसंत उपस्थित राहिले होते. या सत्संगात उपस्थित बाल आणि युवा साधक यांना या दोन बालसंतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. कु. प्रणिता भोर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. पू. भार्गवराम प्रभु आणि पू. वामन राजंदेकर यांच्या जागी २ दैवी शक्ती बसल्या असून त्यांच्याकडून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्यामुळे साधिकेचे शरीर दुसऱ्या बाजूला झुकणे : पू. भार्गवराम प्रभु आणि पू. वामन राजंदेकर हे बालसंत दैवी बालकांच्या सत्संगात आले होते. ते माझ्या उजव्या बाजूला एक आसंदी सोडून बसले होते. मी डोळे मिटल्यावर ‘माझ्या उजव्या बाजूला दोन मोठ्या दैवी शक्ती बसल्या आहेत’, असे मला वाटले. त्यांच्याकडून माझ्याकडे मोठ्या प्रमाणात चैतन्य आणि ऊर्जा प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवून माझे शरीर दोन वेळा डाव्या बाजूला झुकले. तेव्हा मला दैवी नादही ऐकू आला.
२. कु. पूजा कदम, गोवा
२ अ. बालसंतांच्या उपस्थितीमुळे सहजतेने भावजागृती होणे : ‘बालसंतांच्या उपस्थितीमुळे सत्संगात मोठ्या प्रमाणात भावाची स्पंदने प्रक्षेपित होत होती. त्यामुळे भावजागृतीचे प्रयत्न करावे न लागता सहजतेने भाव जागृत होत होता. बालसत्संगातील दैवी बालकांमधील निर्मळता आणि ईश्वराविषयीची भावभक्ती यांमुळे माझ्याकडून भगवंताला आर्तभावाने प्रार्थना होत होत्या.
गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अपार कृपेमुळेच मला ही अनुभूती आली. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
३. कु. वेदिका दहातोंडे (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के, वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून बालसत्संगात उपस्थित असून ‘त्यांच्याकडून बालसाधकांकडे वात्सल्यमय प्रीती प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे : सत्संगाच्या आरंभी बालसत्संग घेणारी साधिका कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे) हिने ‘सत्संगात काय जाणवते ?’, याचे आम्हाला निरीक्षण करण्यास सांगितले. तेव्हा ‘सत्संगातील वातावरण चैतन्यमय झाले असून सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले येथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून बालसाधकांकडे वात्सल्यमय प्रीती प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
३ आ. बालसंतांच्या आगमनामुळे मन शांत आणि स्थिर होणे : थोड्या वेळाने सत्संगात पू. भार्गवराम आणि पू. वामन यांचे आगमन झाले. तेव्हा माझे मन एकदम शांत आणि स्थिर झाले. माझ्या मनात चालू असलेले विचार थांबून ‘माझे मनापासून गुरुस्मरण होत आहे’, असे मला जाणवले.
३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पाद्यपूजेचा भावप्रयोग करतांना भावजागृती होणे : नंतर अपालाने ‘आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पाद्यपूजा करत आहोत’, असा भावप्रयोग घेतला. तेव्हा बालसंतांचे अस्तित्व आणि त्यांची कृपा यांमुळे मी ‘एकाग्रतेने, भावस्थितीत अन् कृतज्ञताभावात राहून पाद्यपूजा करत आहे’, असे मला अनुभवता आले. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृतीही होत होती. त्यामुळे मला ‘संतांच्या अस्तित्वाचा किती लाभ होतो ?’, हे अनुभवता आले.
३ ई. पू. भार्गवराम आणि पू. वामन यांच्या अस्तित्वामुळे जाणवलेली सूत्रे ! : डोळे बंद केल्यावर ‘मी अंतरिक्षात आहे’, असे मला जाणवले. बालसंतांचा देह लहान होता; परंतु ‘त्यांचे मन विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी जोडले गेले आहे’, असे मला जाणवत होते.
३ उ. ‘सर्वसामान्य बालकांप्रमाणे दिसणाऱ्या बालसंतांचे सूक्ष्मातील कार्य अफाट आहे’, असे वाटणे : बालसंतांचे वागणे-बोलणे सर्वसामान्य बालकाप्रमाणे दिसत असूनही ‘ते अनिष्ट शक्तींविरुद्ध लढा देत आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा माझ्या मनात ‘स्थुलातून लहान दिसणाऱ्या या बालसंतांचे सूक्ष्मातील कार्य अफाट आहे. त्यांच्या या कृतींचा कार्यकारणभाव केवळ तेच जाणू शकतात’, असा विचार आला.
‘श्री गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे आम्हाला बालसंतांच्या सहवासाची अनुभूती घेता आली’, यासाठी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !
३ ऊ. बालसंतांमध्ये जाणवलेले गुण ! : दोन्ही बालसंतांच्या सहवासात एक वेगळाच आनंद मिळत होता. त्यांचा खट्याळपणा, उत्साह आणि मनमिळाऊ स्वभाव यांमुळे सर्वांचे मन त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. पू. भार्गवराम यांच्यामध्ये क्षात्रवृत्ती आणि आनंदी वृत्ती हे गुण प्रामुख्याने आढळतात, तर पू. वामन यांच्यामध्ये स्थिरता हा गुण प्रामुख्याने असून त्यांचा स्वभाव शांत आहे. ‘दोन्ही बालसंत म्हणजे गुणांची खाणच आहेत’, असे मला वाटले.
‘त्यांच्यामधील गुण आमच्यामध्ये येऊ देत’, अशी महाविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या कोमल चरणी प्रार्थना करते. ‘हे गुरुमाऊली, आम्ही या बालसंतांकडून पुष्कळ शिकलो, शिकत आहोत आणि पुढेही शिकत राहू ! आम्हाला त्यांचा सहवास दिल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.
४. कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १३ वर्षे)
४ अ. बालसंत येण्यापूर्वी वातावरणात दाब जाणवणे आणि ते आल्यावर शंखनाद ऐकू येऊन तोंडात गोड चव येणे : बालसंत बैठककक्षात येण्यापूर्वी वातावरणात दाब जाणवत होता. ‘इथे अनिष्ट शक्तीही आहेत’, असे मला वाटत होते. काही वेळाने मला शंखनाद ऐकू आला आणि तोंडात गोड चव आली. तेवढ्यात कु. अपालाने सांगितले, ‘‘कृतज्ञता व्यक्त करून थांबूया.’’ तेव्हा मला ‘बालसंतांचे आगमन होत आहे’, असे वाटले. त्या क्षणी बैठककक्षाचे दार उघडून दोन्ही बालसंत एकमेकांचे हात धरून आत आले. ते पाहून मला पुष्कळ आनंद झाला.
४ आ. बालसंतांचे बालसत्संगात आगमन झाल्यावर आलेल्या अनुभूती
४ आ १. चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने जाणवणे : बालसंत आल्यावर अपालाने एक भावप्रयोग घेतला. तो भावप्रयोग मला अंतर्मनापासून अनुभवता येऊन माझी भावजागृती झाली. नंतर तिने ‘आता वातावरणात काय जाणवते ?’, हे अनुभवायला सांगितले. तेव्हा मला वातावरणातील दाब नष्ट होऊन चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने जाणवत होती.
४ आ २. पू. भार्गवराम श्रीकृष्ण आणि पू. वामन श्रीराम रूपात दिसणे : मी डोळे मिटल्यावर ‘सर्वांत वर मला परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले. परात्पर गुरुदेवांच्या खाली उजवीकडे श्रीकृष्ण आणि डावीकडे श्रीराम दिसला. श्रीकृष्णाच्या खाली पू. भार्गवराम प्रभु बसले आहेत आणि श्रीरामाच्या खाली पू. वामन राजंदेकर बसले आहेत’, असे मला दिसले. हे दृश्य पाहून मला पुष्कळ आनंद झाला.
४ इ. बालसंतांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये ! : मला पू. भार्गवराम यांच्यामध्ये सहजता, मनमोकळेपणा, शिकण्याची वृत्ती, ब्राह्मतेज, क्षात्रतेज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा हे गुण जाणवले अन् शिकायला मिळाले. पू. वामन यांच्यामध्ये ज्ञानतेज, सतत अनुसंधानात रहाणे, ध्यानावस्थेत असणे, ऐकण्याची वृत्ती आणि सहजता हे गुण शिकायला मिळाले.
५. कु. श्रीनिवास देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय १० वर्षे)
५ अ. बालसंत सत्संगाच्या ठिकाणी आल्यावर चैतन्यात वाढ होणे : दोन्ही बालसंत येण्यापूर्वी सत्संगाच्या ठिकाणी चैतन्य अल्प होते; पण बालसंत सत्संगात आल्यावर चैतन्यात वाढ झाली. ते एकमेकांचे हात धरून आले, तेव्हा ‘ते इथल्या अनिष्ट शक्तींना दूर करणार’, असे मला वाटले.
५ आ. बालसंतांची जाणवलेली वैशिष्ट्ये : बालसत्संगात बसलेल्या पू. भार्गवराम यांच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर मला ‘त्यांच्यात पुष्कळ क्षात्रतेज आणि भाव आहे’, असे वाटले. पू. वामन बालसत्संगात आल्यावर त्यांच्या आईने त्यांना एक वस्तू आणायला सांगितली. तेव्हा त्यांनी आईला ती वस्तू लगेच आणून दिली. तेव्हा ‘त्यांच्यात ऐकण्याची वृत्ती पुष्कळ आहे’, असे मला वाटले.
(सर्व सूत्रांचा दिनांक १२.१२.२०२१)
या लेखातत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |