एरंडोळ (जिल्हा कोल्हापूर) येथील रामायणाचार्य ह.भ.प. तुळशीराम महाराज पोखरकर यांचा देहत्याग !
कोल्हापूर, १२ एप्रिल (वार्ता.) – आजरा येथील ‘श्री संत ज्ञानेश्वर माऊली गुरुकुल आश्रम, एरंडोळचे संस्थापक रामायणाचार्य ह.भ.प. तुळशीराम महाराज पोखरकर (वय ७४ वर्षे) यांनी १२ एप्रिल या दिवशी त्यांच्या कल्याण (मुंबई) येथील मुलाच्या घरी सकाळी ७ वाजता देहत्याग केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रामायणाचार्य ह.भ.प. तुळशीराम महाराज पोखरकर यांचा अल्प परिचय !
ह.भ.प. तुळशीराम महाराज हे मूळ घोडेगाव, पुणे येथील होते. त्यांनी २ वर्षे हृषिकेश येथील विठ्ठलाश्रम येथे जाऊन संस्कृतचे शिक्षण घेतले. वर्ष २००० मध्ये त्यांनी वयाच्या ५१ व्या वर्षी एरंडोळ येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली गुरुकुल आश्रमाची स्थापना केली.
सनातन संस्था आणि रामायणाचार्य ह.भ.प. तुळशीराम महाराज पोखरकर यांचे विशेष स्नेहबंध !
रामायणाचार्य ह.भ.प. तुळशीराम महाराज पोखरकर आणि सनातन संस्था यांचे स्नेहाचे संबंध होते. महाराजांनी सनातन संस्थेच्या रामनाथी, फोंडा, गोवा येथील आश्रमास भेट दिली होती. ‘सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले हे साक्षात ‘श्रीकृष्ण’ आहेत’, असाच त्यांचा भाव होता, तसेच परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्यावर त्यांची दृढ श्रद्धा होती. महाराजांनी अनेक वेळा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभांमध्ये मार्गदर्शन केले होते. महाराज दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन करत, तसेच त्यांच्या मार्गदर्शनांमधून ‘सनातन प्रभात’चे वाचन करण्याचे आवाहनही करत.