संभाजीनगरकर प्रतिदिन विकत घेतात ७० लाख रुपयांचे पाणी !

संभाजीनगर – महापालिका ८-१० दिवसांआड पाणी पुरवत असल्याने संभाजीनगरकरांना प्रतिदिन ७० लाख रुपये व्यय करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. यामुळे खासगी टँकरचालक मालामाल झाले आहेत. शहरात सध्या १ सहस्रांहून अधिक खासगी टँकर आहेत.

६०० ते ७०० रुपये शुल्क असलेले टँकर एका दिवसात किमान १० फेऱ्या मारतात. शहरातील सातारा, देवळाई, हर्सूल, पडेगाव, चिकलठाण्यासह टंचाईग्रस्त वसाहतींमधून त्यांची मोठी कमाई होते. पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंतही टँकरची उलाढाल ४० लाख रुपयांवर असते. त्यामुळे किमान ५० लाख रुपयांची सरासरी गृहित धरली, तर एका मासात १५ कोटी रुपये आणि वर्षभरात किमान १८० कोटी रुपयांचे पाणी संभाजीनगरकर विकत घेत आहेत.

पावसाळा आणि हिवाळा यांमध्ये ५ सहस्र लिटरच्या टँकरसाठी २५० रुपये मोजावे लागत होते. उन्हाळा लागताच हे शुल्क ७०० रुपयांवर गेले. वर्ष १९९५ मध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक प्रचारात ‘टँकरमुक्त महाराष्ट्रा’ची घोषणा केली होती; मात्र संभाजीनगरकर टप्प्याटप्प्याने टँकरच्या विळख्यात अडकत गेले. वर्ष १९९७-९८ मध्ये ६७ एम्.एल्.डी. पाणी आणण्यासाठी आखलेली ६७ कोटी रुपयांची नळ योजना कोरडी झाली. आता नव्या योजनेकडे सर्वांचे लक्ष आहे.