अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी !

मुंबई – एस् टी. कर्मचाऱ्यांचे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी १३ एप्रिलपर्यंत वाढण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एस्. टी. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती.

सदावर्ते यांच्या २ दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत ११ एप्रिल या दिवशी संपत असल्याने त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. या वेळी मुंबई पोलिसांनी त्यांची अधिक पडताळणी करण्यासाठी ११ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली; मात्र न्यायालयाने केवळ २ दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली. या प्रकरणी पोलिसांनी सदावर्ते यांच्या घराची झाडाझडती घेतली आहे. तसेच काही सीसीटीव्ही चित्रीकरणही कह्यात घेतले आहे. त्यांच्या ‘व्हॉट्सॲप’वरील संभाषणाची पडताळणी करण्यात येत असून या प्रकरणी नागपूरचा काही संबंध आहे का ?, याचे पोलीस अन्वेषण करत आहेत. या गुन्ह्यात सचिदानंद पुरी यांच्यासह आणखी तिघांना पोलिसांनी कह्यात घेतले असून त्यांची चौकशी चालू आहे.