(म्हणे) ‘धर्मसंस्थेची कठोर चिकित्सा आवश्यक !’ – डॉ. शरद बाविस्कर, प्राध्यापक, जे.एन्.यू.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘धर्मभावना, धर्मसंस्था आणि धर्मचिकित्सा’ विषयावरील व्याख्यान
धर्मसंस्थेच्या चिकित्सेची भाषा करणाऱ्यांनी प्रथम धर्माचा अभ्यास म्हणजे साधना केली आहे का ? अभ्यास न करता धर्माच्या चिकित्सेची भाषा करणे हा प्रसिद्धीसाठी केलेला प्रयत्नच म्हणावा लागेल ! – संपादक
पुणे – धर्मभावनेचा जेव्हा जेव्हा स्वार्थासाठी वापर होतो, तेव्हा तिचे संस्थाकरण केले जाते. एका बाजूला धर्मभावनेचा आदर ठेवणे आवश्यक असले, तरी धर्मसंस्थेची कठोर चिकित्सा आवश्यक आहे. सर्व धर्मांसाठी हे पथ्य आवश्यक आहे. विज्ञानाचाही शोषणासाठी वापर केला जात असेल, तरी त्याची चिकित्सा होणे आवश्यक आहे, असे मत जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. शरद बाविस्कर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ. बाविस्कर यांचे ‘धर्मभावना, धर्मसंस्था आणि धर्मचिकित्सा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमात ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, समितीचे दीपक गिरमे, डॉ. हमीद दाभोलकर आदी उपस्थित होते. (ज्यांच्या ‘ट्रस्ट’मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे त्यांचे माजी कार्याध्यक्षच मान्य करतात, त्यांनी धर्मचिकित्सा करण्यासाठी व्याख्यान ठेवणे, हा एक मोठा विनोद आहे. आधी ‘ट्रस्ट’मध्ये झालेल्या घोटाळ्याची, तसेच घोटाळा करणाऱ्यांची चिकित्सा करणे आवश्यक आहे ! सर्व धर्मांच्या नावे भाषण करणारे प्रत्यक्षात केवळ हिंदु धर्मालाच लक्ष्य करतात, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक)
ग्रामीण भागांत किंवा आपल्या संस्कृतीतील बरेचसे सण-समारंभ हे तार्किकतेला पटणारे नाहीत; पण ते जगण्याला एक निश्चित आयाम देतात. ते आयाम कदाचित् तार्किक नसतील पण भावनिक असतात. (आपल्या संस्कृतीतील सण-समारंभ हे अतार्किक नसून त्यांना अध्यात्मशास्त्रीय आधार आहे ! अभ्यासहीन टीका करणारे अशी वक्तव्ये करून समाजाची दिशाभूल करत आहेत ! – संपादक)