सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा ७५ वा संजीवन समाधी सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा !
कोल्हापूर, ११ एप्रिल (वार्ता.) – येथील स्वामी विश्व परिवाराकडून सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा ७५ वा संजीवन समाधी सोहळा आणि दुर्गाष्टमी सोहळा ९ एप्रिल या दिवशी शिवाजी पेठ येथील वेताळमाळ तालीम येथे भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सद्गुरु श्री शंकर महाराज यांचे शिष्य श्री मयुरेश महाराज यांनी रुद्राभिषेक केला. स्थानदेवता वेताळ देवतेलाही रुद्राभिषेक करण्यात आला. या वेळी महाराष्ट्रात ८ ठिकाणी हा सोहळा साजरा करण्यात येत आहे. भजन, महाआरती, महाप्रसाद, भव्य पालखी मिरवणूक आणि भजन संध्या असे कार्यक्रम पार पडले.
पालखी मिरवणुकीत सद्गुरु श्री शंकर महाराज यांची मूर्ती, धनगरी ढोल, लेझीम यांसह विठ्ठल-रुक्मिणी आणि साईबाबा यांचे पात्र साकारण्यात आले होते. ही मिरवणूक बिनखांबी गणेश मंदिर, उभा मारुति चौक, वेताळ माळ अशी काढण्यात आली. श्री. नितीन कोराने आणि परिवाराच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि सनातनचे ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. श्री मयुरेश महाराज यांनीही सनातन संस्थेच्या कक्षास सदिच्छा भेट दिली.