स्वतः रचलेल्या गोष्टी आणि सुंदर अन् सुबक चित्रे या माध्यमांतून आपले पणतू आणि सनातनचे पहिले बालक संत पू. भार्गवराम (वय ४ वर्षे) यांना विविध गोष्टींची शिकवण देणाऱ्या पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८४ वर्षे) !
मंगळुरू, कर्नाटक येथील सनातनच्या ४४ व्या संत पू. राधा प्रभु (वय ८४ वर्षे) यांनी त्यांचे पणतू आणि सनातनचे पहिले बालक संत पू. भार्गवराम प्रभु यांच्यासाठी स्वतः काही कथा तयार केल्या आहेत. एका वहीत त्यांनी निर्जीव वस्तू, झाडे, फुले, प्राणी-पक्षी आदींची सुंदर अन् सुबक चित्रे काढली आहेत. पू. भार्गवराम यांना विविध गोष्टींचे ज्ञान व्हावे, यासाठी पू. राधा प्रभुआजी (पू. भार्गवराम यांची पणजी) या चित्रांच्या माध्यमातून अनेक स्वरचित कथा पू. भार्गवराम (त्या वेळचे (वर्ष २०१९ मधील) वय २ वर्षे) यांना समजावून सांगायच्या. यामुळे पू. भार्गवराम यांच्या मनात निसर्ग, प्राणी-पक्षी, फुले इत्यादी अनेक गोष्टींची जिज्ञासा निर्माण होऊन त्यांना अनेक विषयांचे ज्ञानही मिळू लागले. यातून ‘एक संत दुसऱ्या संतांकडे ज्ञानाचा अमूल्य ठेवा कसा सुपुर्द करतात ? आणि सुसंस्कारांचे बाळकडूही कसे देतात ?’, हे शिकायला मिळते. पू. राधा प्रभु यांनी चित्रांतून सात्त्विक आणि असात्त्विक गोष्टींविषयीची शिकवणही दिली आहे. त्यांनी काढलेल्या या चित्रांकडे पाहून भावजागृती होते आणि वही हातात घेतल्यावर ध्यान लागते.
ही चित्रे बारकाईने पाहून त्याविषयी प्रश्न विचारणाऱ्या पू. भार्गवराम यांची बुद्धीमत्ता लक्षात येते, तसेच प्रत्येक गोष्टीमागील कारण जाणून घेण्याची त्यांची जिज्ञासू वृत्तीही दिसून येते. वहीतील असात्त्विक गोष्टी आणि वस्तू यांच्या चित्रांवर त्यांनी रेघोट्या मारल्या आहेत किंवा ते चित्रच फाडून टाकले आहे.
पू. राधा प्रभु यांनी काढलेली चित्रे आणि ती पहातांना पू. भार्गवराम अन् पू. राधा प्रभु यांच्यात झालेला संवाद पुढे दिला आहे.
१. पू. राधा प्रभुआजी यांनी वहीवर ३ भाषांत पू. भार्गवराम यांचे नाव लिहिणे आणि त्यांना गाय-वासरू यांच्या माध्यमातून शिकवणे
चित्र काढलेला दिनांक : मे २०१९
चित्राचे वर्णन : या चित्रात पू. भार्गवराम यांचे नाव तीन भाषांत लिहिले असून चित्रात एक गाय आहे आणि तिचे छोटेसे वासरू गायीचे दूध पित आहे. हे चित्र पहाण्यापूर्वी आणि पहातांना पू. भार्गवराम आणि पू. राधा प्रभु (पू. भार्गवराम यांची पणजी) यांच्यात झालेला संवाद पुढे
दिला आहे.
पू. भार्गवराम : आजमा (पू. भार्गवराम पू. राधा प्रभु यांना ‘आजमा’ या नावाने हाक मारतात.), मला गोष्ट सांगा.
पू. राधा प्रभु (पणजी) : तू तुझी वही आण. मी तुझ्या चित्रांच्या वहीतील कथा सांगते.
पू. भार्गवराम : ही माझी वही.
पू. राधा प्रभु : हो. ‘ही तुझी वही आहे’, हे समजण्यासाठी मी तुझे नाव ‘कन्नड’, ‘हिंदी’ आणि ‘इंग्रजी’ या तीन भाषांत लिहिले आहे.
पू. भार्गवराम (चित्रातील गायीकडे बोट दाखवून) : ही गाय आहे. ही कृष्णाची गाय आहे. तिचे वासरू तिच्या आईचे दूध पीत आहे. मीसुद्धा माझ्या आईचे दूध पितो.
२. तेवणाऱ्या पणतीद्वारे प्रकाशाचे, तर शंख, देवतांची शस्त्रे आणि श्री लक्ष्मीदेवीचे कमळ या माध्यमांतून देवतांचे ज्ञान करून देणे
चित्र काढलेला दिनांक : ६.७.२०१९
चित्राचे वर्णन : जुलै २०१९ मध्ये पू. राधा प्रभु रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी आश्रमातील एका फलकावर एका युवा-साधकाने काढलेले चित्र पाहून पू. राधा प्रभु यांनी ही चित्रे काढली आहेत. या चित्रात त्यांनी तेवणारी पणती, शंख, चक्र, गदा आणि पद्म (कमळ)
रेखाटले आहे.
१. तेवणारी पणती (दीपावलीच्या वेळी अशी पणती सर्वत्र लावली जाते.)
२. शंख (श्रीकृष्णाचा शंख)
३. चक्र (श्रीकृष्णाचे चक्र)
४. गदा (ही देवतांच्या हातात असते.)
पू. भार्गवराम : ही गदा हनुमंताच्या हातात असते ना ?
पू. राधा प्रभु : हो. दुष्टांचा संहार करण्यासाठी हनुमंत हिचा उपयोग करतो.
५. कमळ (या फुलावर श्री लक्ष्मीदेवी उभी असते. हे पाण्यात वाढते.)’
३. पू. भार्गवराम यांची नावेत बसण्याची आवड आणि नावेत बसल्यावर ‘देव आपले रक्षण करेल’, अशी त्यांच्या मनात असलेली श्रद्धा !
चित्र काढलेला दिनांक : १.५.२०१९
चित्राचे वर्णन : या चित्रात पाण्यावर तरंगणाऱ्या दोन होड्या आहेत.
पू. भार्गवराम : ही होडी (नाव) आहे. मी होडीत बसतो.
पू. राधा प्रभु : होड्या पाण्यावर चालतात. पाणी बघितल्यावर तुला भीती वाटणार नाही का ?
पू. भार्गवराम : नाही. मी तुमच्या मांडीवर बसेन. देव आपले रक्षण करील ना ?
पू. राधा प्रभु : हो. देव आपल्या दोघांचे रक्षण करेल !
४. पू. भार्गवराम प्रभु यांचा गुरुपादुकांप्रती असलेला भाव !
चित्र काढलेला दिनांक : १.५.२०१९
पू. राधा प्रभु : या गुरुपादुका आहेत. आश्रमातील ध्यानमंदिरात तू पाहिल्या आहेस ना ?
पू. भार्गवराम प्रभु : हो. मी प्रतिदिन त्यांना नमस्कार करतो.
५. चित्र पहातांना पू. भार्गवराम यांची दिसून येणारी जिज्ञासू वृत्ती आणि त्यांचा प्रेमभाव !
चित्र काढलेला दिनांक : ३.५.२०१९
चित्राचे वर्णन : या चित्रात नारळाचे झाड, शिडी, कोयता, सुरी, शहाळी, फळांचा रस, चमचा, आईस्क्रिम इत्यादी सर्व सुबक रितीने रेखाटले आहे.
पू. भार्गवराम : हे सर्व काय आहे ?
पू. राधा प्रभु : हे नारळाचे झाड, शिडी, कोयता, सुरी, शहाळी, फळांचा रस, चमचा, आईस्क्रिम इत्यादी सर्व आहे.
पू. भार्गवराम : ही शिडी कशासाठी आहे ?
पू. राधा प्रभु : नारळाच्या झाडाला शहाळी उंचावर लागतात ना; म्हणून झाडाला शिडी लावून हातांनी शहाळी काढून ती खाली टाकावी लागतात.
पू. भार्गवराम : येथे ३ शहाळी आहेत ना, ती कोणासाठी आहेत ?
पू. राधा प्रभु : १ शहाळे तुला, एक तुझ्या आईला आणि एक तुझ्या बाबांसाठी आहे.
पू. भार्गवराम : आणि तुम्हाला शहाळे ?
पू. राधा प्रभु : येथे आईस्क्रिम आहे ना, ते माझ्यासाठी आहे.
पू. भार्गवराम : येथे आणखी एक आईस्क्रिम आहे, ते माझ्यासाठी आहे. येथे चमचेसुद्धा आहेत. येथे ५ पेले फळांचा रसही (ज्यूसही) आहे. तो रस आजी, बाबा, आई, मामा यांच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. (वर्ष २०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |