विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने घडवा !
विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ या विषयावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विद्यार्थ्यांच्या मनाची एकाग्रता का होत नाही ? परीक्षांची भीती का वाटते ? परीक्षेला सामोरे कसे जावे ? खरा आनंद कशामध्ये आहे ?’, या आणि यांसारख्या अनेक सूत्रांवर चर्चा केली. यामध्ये पंतप्रधान मोदी यांचा सर्व कल ‘विद्यार्थ्यांनी स्वतःला समजून घ्यावे, स्वतःची ताकद ओळखावी, वर्तमानकाळात रहावे, समस्यांना आत्मविश्वासाने सामोरे जावे आणि मनाने कणखर होण्यासाठी ध्यान लावावे’, यांवर होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले प्रत्येक सूत्र अभ्यास करण्यासारखे आणि विचार करायला लावणारे आहे. त्यांनी पालक आणि शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवण्यात कुठे अल्प पडत आहेत, यावरही प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये सर्वांत मोठा वाटा पालक आणि शिक्षक यांचाच असतो. मुलांचे पहिले गुरु आई-वडील आणि दुसरे शिक्षक असतात; परंतु आताची स्थिती पाहिल्यास आई-वडिलांना आपल्या पाल्याच्या मनाचा किंवा त्याची क्षमता, त्याची आवड यांचा विचार करायला वेळच नाही. पालक ‘स्वतःला काय वाटते किंवा मला जे जमले नाही, ते अपूर्ण स्वप्न माझ्या मुलाने पूर्ण करायला हवे’, या अट्टहासापोटी कुठेतरी मुलांची ओढाताण करतात. यातून सर्वांचाच आनंद जातो. जे हवे त्याच्या मागे धावण्याऐवजी वेगळ्याच मार्गाने धावल्यामुळे खऱ्या अर्थाने घडणे होत नाही.
विद्यार्थ्यांना घडवण्यात दुसरा महत्त्वाचा वाटा शिक्षकांचा असतो; परंतु सध्याच्या शिक्षकांचाही विद्यार्थ्यांपेक्षा अभ्यासक्रम संपवून पैसे मिळवण्याकडे कल अधिक असतो. पूर्वीच्या शिक्षकांचे मुलांसमवेत त्यांच्या कुटुंबाशीही नाते होते. त्यामुळे विद्यार्थी कुठे अल्प पडतो ? त्याला कसे घडवायला हवे ? हे त्यांच्या लक्षात येत असल्यामुळे ते विद्यार्थ्याला योग्यरित्या साहाय्य करत होते. सध्या हे भूतकाळात जमा झाले आहे.
मनाची एकाग्रता होण्यासाठी आध्यात्मिक बळाची आवश्यकता आहे, याचे महत्त्व ना पालकांना जाणवते ना शिक्षकांना ! विद्यार्थ्यांना तर कशाचाच अनुभव नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण जसे घडवतो, तसे ते घडतात. काही काळ गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की, आपण स्वतः कुठे न्यून पडत आहोत. हे टाळण्यासाठी आणि ‘आजचे तरुण हेच देशाची भावी पिढी आहे’, हे लक्षात घेऊन पालक अन् शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने घडवण्याकडे लक्ष द्यायला हवे.
– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, सनातन आश्रम देवद, पनवेल.