सनातनच्या ६८ व्या संत जळगाव येथील पू. (श्रीमती) केवळबाई पाटील (वय ८० वर्षे) यांनी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन
जळगाव येथील पू. (श्रीमती) केवळबाई पाटील (वय ८० वर्षे) यांची २०.५.२०१८ या दिवशी सौ. प्रियांका गाडगीळ (पूर्वाश्रमीच्या कु. प्रियांका लोटलीकर) यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत पू. (श्रीमती) पाटीलआजी यांनी साधनेविषयी केलेल्या मार्गदर्शनातील काही भाग येथे देत आहोत.
१. देवाजवळ काही मागू नये, देवाची आराधना केल्यावर देव आनंदी आनंद देतो !
‘देवाला नवस करून ‘मला हे देशील का ? ते देशील का ?’, असे काही म्हणायचे नाही. देवाला केवळ विचारायचे, ‘देवा, हे कसे करायचे ?’ देव ते आपोआप करून घेतो. देवाजवळ मी कधी काही मागितले नाही. ‘देवा, मला संपत्ती दे, धन दे’, असे कधी म्हटले नाही. आपण केवळ देवाची आराधना करायची. मी देवाजवळ काही न मागताच त्याने मला सर्व दिले. मला आनंदी आनंद दिला.’
२. पंढरपूरच्या वारीला जाता न आल्याने पू. (श्रीमती) केवळबाई पाटीलआजी यांना दुःख होऊन त्यांनी पांडुरंगाला आळवणे आणि स्वप्नात पांडुरंगाचे दर्शन होऊन त्याने ‘विमान’ आणलेले दिसणे
‘एकदा आमच्या गावातील सर्व लोक पंढरपूरला वारीला चालले होते. तेव्हा मला वाटले, ‘आपणही जायला पाहिजे.’ माझे यजमान मला म्हणाले, ‘‘आता आपण जायला नको. आपल्याला बोलावल्यानंतर जाऊ.’’ त्यामुळे वारीला जायचे राहिले. त्या दिवशी मी पूर्ण दिवस शेतात गेले आणि रडले. पांडुरंगाला म्हणाले, ‘पांडुरंगा, तू मला भेट देणार नाहीस. तू किती दूर आहेस ! आता माझी भेट कशी होईल ?’, असे म्हणून मी पूर्ण दिवस रडत होते.
नंतर शेतातून घरी आल्यावर मी स्वयंपाक केला; पण माझ्या मनात वारीचेच विचार होते. पांडुरंगाची आराधना करत करतच मला झोप लागली. मला स्वप्नात पांडुरंगाने आणलेले ‘विमान’ दिसले. पांडुरंगाने ते माझ्या अंगणात उभे केले. मी म्हणाले, ‘देवा, पूर्ण दिवस मी तुझाच धावा केला.’ मी उठून देवाला नमस्कार करणार, इतक्यात मला जाग आली. उठल्यावर बघते, तर बरोबर त्याच वेळी आकाशातून एक ‘हेलिकॉप्टर’ चालले होते. मी त्या ‘हेलिकॉप्टर’कडे बघतच राहिले.’
– (पू.) श्रीमती केवळबाई पाटील, जळगाव (२२.५.२०१८)
३. ‘आश्रमात कसे रहायला हवे ?’, याचा आदर्श आपल्या कृतीतून घालून देणाऱ्या पू. (श्रीमती) केवळबाई पाटीलआजी !
३ अ. जळगाव सेवाकेंद्रात स्वयंपाक करण्याच्या सेवेला गेल्यावर पू. आजींनी आपल्या सुनेचे साहाय्य घेऊन स्वतः स्वयंपाकघराची स्वच्छता करणे : ‘पू. केवळबाई पाटीलआजी (आई) १ मास जळगाव सेवाकेंद्रात स्वयंपाक करण्याच्या सेवेसाठी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले की, स्वयंपाकघर अस्वच्छ आहे. त्याची स्वच्छता करायला हवी.’ त्यांनी माझ्या पत्नीला (सौ. वनिता पाटील यांना) ‘तू स्वच्छतेच्या सेवेसाठी येतेस का ?’, असे विचारले. पू. आजी आणि माझी पत्नी या दोघींनी मिळून स्वयंपाकघराची स्वच्छता केली. त्यानंतर स्वयंपाकघर चमकायला लागले. सनातनचे धर्मप्रचारक संत पू. अशोक पात्रीकरकाका, तसेच सेवाकेंद्रातील साधक म्हणाले, ‘‘आज किती लखलखीत वाटत आहे.’’
– श्री. वसंत पाटील (पू. आजींचा मुलगा), नंदुरबार (२२.५.२०१८)
(‘यातून पू. आजींची तळमळ दिसते. ‘स्वयंपाकघर स्वच्छ करा’, असे त्यांना कुणीही सांगितले नव्हते; पण पू. आजींनी आपणहून ते स्वच्छ करायचे ठरवले. ‘सेवाकेंद्र म्हणजे आपल्या गुरूंचे घर आहे. तेथे प्रत्यक्ष श्री गुरूंचे अस्तित्व आहे. त्यामुळे तेथील प्रत्येक गोष्ट स्वच्छ असायला हवी’, असा त्यांचा भाव आहे. या प्रसंगातून सर्व साधकांना पुष्कळ शिकण्यासारखे आहे.’ – संकलक)
४. जळगाव सेवाकेंद्रातील साधकांसाठी स्वयंपाक करतांना पू. पाटीलआजींचा भाव !
‘जळगाव सेवाकेंद्रातील स्वयंपाकघरात सेवा करतांना माझ्या मनात भाव असायचा, ‘गुरुदेवा, माझ्याकडून ही सर्व सेवा होईल का ? तुम्हीच हे सर्व करून घेणार आहात. माझ्या हातून काही चूक होणार नाही, हे तुम्हीच पहा.’ मी गुरुदेवांना सतत हाक मारायचे. त्यामुळे न्याहारी करतांना कधीच काही अल्प पडले नाही. केलेले सर्व पदार्थ साधकांना आवडायचे. मी नामजप करत साधकांसाठी स्वयंपाक करायचे. सतत नामजप केल्याने माझ्या हृदयातच जणू नामजप बसला होता. गुरुदेवांनी सर्व करून घेतले. त्यांनीच मला बुद्धी दिली. मी त्यांनाच हाक मारत होते. ‘मी केले’, असे कधीच म्हणायचे नाही. गुरुदेवच सर्व फळ देतात.’
– पू. (श्रीमती) केवळबाई पाटीलआजी, जळगाव (२२.५.२०१८)
पू. (श्रीमती) केवळबाई पाटील यांचा परात्पर गुरु डॉक्टर आणि सनातनची उत्पादने यांच्या प्रती असलेला भाव !१. ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉक्टर) अतिशय महान आहेत. तेच सगळे करून घेत आहेत ! २. सनातनची सर्व उत्पादने म्हणजे माझ्या गुरूंचे, परात्पर गुरु डॉक्टरांचे रूप आहे.’ |
साधकांना सूचना आणि वाचकांना विनंतीसनातनच्या ६८ व्या संत जळगाव येथील पू. (श्रीमती) केवळबाई पाटीलआजी यांचा साधनाप्रवास सनातन संस्थेच्या पुढील लिंकवर उपलब्ध ! लिंक : https://www.youtube.com/watch?v=_gLDXOb8Upw या लिंकवरील ध्वनीचित्रफितीत ‘पू. (श्रीमती) केवळबाई पाटीलआजी यांची बालपणापासूनची साधना, सासरचे कष्टमय जीवन, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांची देवावरील दृढ श्रद्धा आणि त्यांचे देवाशी टिकून राहिलेले अनुसंधान, पू. आजी यांनी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार केलेली भावपूर्ण अन् परिपूर्ण साधना, तसेच पू. पाटील आजी यांना आणि त्यांच्यासंदर्भात इतरांना आलेल्या अनुभूती’, इत्यादी सूत्रांविषयी त्यांची भावपूर्ण मुलाखत पहावी. ही मुलाखत सौ. प्रियांका गाडगीळ यांनी घेतली आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले पू. केवळबाई पाटीलआजींच्या साधनाप्रवासाची ही ध्वनीचित्रफीत पाहून म्हणाले….१. लिहिता-वाचता न येणाऱ्या पू. आजींचे आध्यात्मिक वैशिष्ट्य थक्क करणारे आहे. २. पू. आजींच्या पतींना ऐकायला अल्प येत असूनही त्यांच्या तोंडवळ्यावर एकच स्थिर भाव आहे. ३. ‘पू. आजींचा मुलगा आणि सून हेही साधनेत प्रगती करत आहेत’, असे जाणवते. ४. ही ध्वनीचित्रफीत पाहून ‘प्रत्येकालाच पू. आजींना कधी भेटीन’, असे वाटेल. ५. एक अशिक्षित (लिहिता-वाचता न येणारी) स्त्री संतपदाला पोहोचते, तर शिक्षितांनी आपण का पोहोचू शकत नाही? याचा विचार करावा.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |