डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !
विद्यार्थ्यांनो, ‘गाणे हे श्वासावरचे लेणे आहे’, हे लक्षात ठेवा !
पू. किरण फाटक हे डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक आहेत. त्यांचे वडील श्री. भास्करराव फाटक हे घरी संगीताच्या शिकवण्या घेत होते. त्यामुळे पू. किरण फाटक संगीताच्या वातावरणातच लहानाचे मोठे झाले. पुढे त्यांनी बांद्रा (मुंबई) येथील स्व. इंदिराबाई केळकर आणि त्यानंतर पुणे येथील श्री. विकास कशाळकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले.
पू. किरण फाटक हे ‘संगीत अलंकार’ असून गेल्या ३० वर्षांपासून डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे ‘भारतीय संगीत विद्यालया’च्या माध्यमातून मुलांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण देत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी, तसेच अन्य संगीत कार्यक्रमांना त्यांना परीक्षक म्हणून बोलावले जाते. ते श्री स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांना स्वामी समर्थांवर विविध काव्ये आणि भक्तीपर कवने स्फुरली आहेत. आतापर्यंत त्यांचे ४ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी ‘संगीत’ या विषयावर विविध ग्रंथांचे लिखाणही केले आहे. ६.१.२०२० या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. किरण फाटक यांनी संतपद (७१ टक्के आध्यात्मिक पातळी) गाठल्याचे घोषित केले.
‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मौलिक मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी काही लेखांमधून केले आहे. त्यांच्या या लेखांमधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.
– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.३.२०२२)
१. गाण्याच्या समवेतच श्वासाचे गणितही शिकावे लागणे आणि त्यामुळे गायन अर्थपूर्ण होणे
‘माणसाला जगण्यासाठी प्राणवायूची निकड असते. हा प्राणवायू माणसाला श्वासावाटे मिळत असतो. श्वास थांबला की, माणसाचा प्रवास संपला !
या श्वासाचा गाण्यातसुद्धा फार महत्त्वाचा सहभाग असतो. ‘गातांना श्वास कुठे, कधी आणि किती घ्यावा ?’, हे कळणे फार आवश्यक असते. त्यातून शब्दभरल्या आणि शब्दभारल्या सुगम संगीतात शब्द अन् श्वास यांचे प्रेम जमावेच लागते. शब्द आणि श्वास यांच्या मीलनातून उच्चार अन् उच्चारातून भावनिर्मिती होत असते; म्हणून गाण्याच्या समवेतच श्वासाचे गणितही शिकावे लागते, तरच ते गायन अर्थपूर्ण होते.
२. श्वास आणि मनात उमललेला आलाप यांची लांबी सारखी असणे आवश्यक !
शास्त्रीय संगीतात आलापामध्ये श्वासाची कसोटी लागते; कारण जरा जरी श्वास अल्प पडला, तरी स्वर कणसूर (टीप १) होण्याचा संभव असतो किंवा स्वर ओघळण्याचा (बेसूर होण्याचा) संभव असतो. श्वास आणि मनात उमललेला आलाप यांची लांबी सारखी असणे फार आवश्यक असते. श्वासाची लांबी जर आलापाच्या (टीप २) लांबीहून न्यून पडली, तर आलाप मधेच तुटतो. हे ऐकणाऱ्याला सहज समजते आणि रसभंग होतो.
टीप १ – एखादा स्वर गातांना किंवा वाजवतांना त्याच्या आधी किंवा पुढे येणाऱ्या स्वराला अलगद स्पर्श करून तो म्हटला किंवा वाजवला असता त्या स्वरांना ‘कणसूर’ किंवा ‘कणस्वर’, असे म्हणतात.)
टीप २ – रागदर्शक स्वरांचा संथ गतीने केलेला विस्तार म्हणजेच ‘आलाप’ होय. स्वरांचा उच्चार केवळ ‘आऽऽऽ’कारात करणे म्हणजे ‘आलाप’.
३. विद्यार्थीदशेत ‘सा’चा सराव करणे अत्यंत आवश्यक !
स्वर एका ठिकाणी निदान २० सेकंद तरी स्थिर लागणे निकडीचे असते. स्वर हालता-डोलता काम नये. जो स्थिर नाही, तो स्वरच नाही; म्हणून नवीन विद्यार्थ्याला ‘सा’चा सराव करण्यास सांगितले जाते. हा सराव फार महत्त्वाचा असतो. ‘सा’ लावतांना श्वासावर लक्ष ठेवावे लागते आणि मन एकाग्र करावे लागते.
४. स्वरसमूह पुरेशा श्वासांवर गायल्यावर ‘समाधी अवस्था’ प्राप्त होत असणे आणि त्यासाठी गायनाच्या अभ्यासात श्वासाचा अभ्यास महत्त्वाचा असणे
थोर संत सांगतात, ‘देवाचे नाम श्वासावर घ्यावे, म्हणजे स्वभावदोषांचे निर्मूलन होऊन मन समाधी अवस्थेचा अनुभव करते.’ त्याप्रमाणे स्वरसमूह पुरेशा श्वासांवर गायले, तर मनाला ‘समाधी अवस्था’ नक्कीच प्राप्त होते; म्हणून गायनाच्या अभ्यासात श्वासाचा अभ्यास करणे फार महत्त्वाचे असते.
५. तानेत श्वासावरही नियंत्रण असणे आवश्यक असणे
तानेमध्ये (टीप ३) मात्र स्वर हे द्रुतगतीत फिरत असल्याने एक दीर्घ श्वास पुरतो. मनातील तान आणि श्वास यांचे इथेही सुत जमावे लागते. तानेत सुरेलपणा, राग आणि वेग यांच्यावर नियंत्रण ठेवतांना श्वासावरचे नियंत्रण मात्र सुटता कामा नये.
टीप ३ – रागातील स्वरांच्या जलद गतीने केलेल्या विस्तारास ‘तान’, असे म्हणतात.
६. गायनात बोल तानेत मिसळून फिरवणे अत्यंत कौशल्याचे असणे आणि त्यासाठी श्वासावरचे नियंत्रण पुष्कळ डोळसपणे करावे लागणे
गायनाच्या ‘बोल’ या अंगात तर श्वासांवर पुष्कळच नियंत्रण ठेवावे लागते. बोल हे ‘आ’कारांत, ‘ए’कारांत, ‘ई’कारांत, ‘ऊ’कारांत, ‘ओ’कारांत असतात. ते तानेत मिसळून फिरवणे अत्यंत कौशल्याचे काम असते. अशा वेळी श्वासावरचे नियंत्रण पुष्कळ डोळसपणे करावे लागते.
७. एकंदरीत गायन शिकायचे असेल, तर श्वासाचे विज्ञान अंगीभूत करून घ्यावे लागते. असे केल्याने गाणे सुरेल होते आणि श्रोत्यांना वेगळीच स्वरानुभूती देते.
८. ‘आजकाल काही अनुभवी गुरु आणि शिक्षक विद्यार्थ्यांना हे श्वासाचे धडे देत नसावेत’, असे मला वाटते; कारण नवीन पिढीच्या गायनात सुरेलपणा अन् भारदस्तपणा जरा अल्प अंशात (प्रमाणात) जाणवतो.
९. ‘गाणे हे श्वासावरचे लेणे आहे’, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे आणि ‘दैवी स्वरांच्या दिशेने आपला प्रवास चालू ठेवावा’, असा समादेश (सल्ला) मी संगीत शिकणाऱ्या साधकांना देईन.’
– (पू.) किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१.६.२०२१)