मुंबई येथे ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला मिळालेला प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्‍या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांचा संकल्प यांमुळे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मुंबईमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या अभियानाच्या माध्यमातून अनेक जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि साधक या सर्वांपर्यंत गुरुमाऊलींची ज्ञानगंगा पोचली. गुरुदेवांची ज्ञानशक्ती आणि सद्गुरु अनुराधाताईंचे लाभलेले मार्गदर्शन यांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचा लाभ घेण्यासाठी समाजातून अनेक जिज्ञासू, धर्मप्रेमी, वाचक अन् हितचिंतक मोठ्या संख्येने अभियानात कृतीशील सहभाग घेत आहेत. ‘हा प्रतिसाद पाहून गुरुदेवांची ज्ञानगंगा प्रवाहित होऊन सर्व जण त्या चैतन्यात न्हाऊन निघत आहेत’, अशी अनुभूती सर्वांनी घेतली. ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मुंबई येथे मिळालेल्या प्रतिसादाविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.


दैवी आशीर्वाद लाभलेले सनातनचे ग्रंथ

१. सनातनचा ग्रंथ वाचून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणार्‍या सौ. भारती डंबळ !

सौ. विद्यागौरी गुजर

‘नेरुळ (नवी मुंबई) येथील सौ. भारती डंबळ यांनी ‘स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व आणि गुणसंवर्धन प्रक्रिया’ हा ग्रंथ विकत घेतला. ‘आपल्यातील स्वभावदोष कसे शोधायचे ? आपल्यामध्ये गुण निर्माण होण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ? स्वयंसूचना सत्रे म्हणजे काय ?’, याविषयी त्यांनी मला विचारले. त्याप्रमाणे त्या प्रयत्न करतात. त्यांना भेटायला गेल्यावर त्या मला घडलेला प्रसंग सांगून त्यामागील स्वभावदोष जाणून तो लिहून घेतात.

२. बरेच जिज्ञासू आणि वाचक यांनी ‘तिथीनुसार वाढदिवस कसा साजरा करायचा ?’, याविषयी जाणून घेतले. आता ते तिथीनुसार आणि औक्षण करून वाढदिवस साजरा करतात.

३. वनौषधींच्या लागवडीविषयी जिज्ञासेने जाणून घेऊन घराच्या आगाशीत वनौषधींची लागवड करणार्‍या सौ. प्रतिभा पाटील !

नेरुळ (नवी मुंबई) येथील सौ. प्रतिभा पाटील यांनी वनस्पतींच्या लागवडीविषयीचे ग्रंथ विकत घेतले. त्यांचे वाचन करून त्यांनी घराच्या आगाशीत कुंडीमध्ये वनौषधी लावल्या. त्यांच्या अन्य नातेवाइकांनाही त्यांनी वनौषधींच्या लागवडीविषयी सांगितले.

४. ‘सण, उत्सव आणि व्रते’ या ग्रंथात शास्त्र चांगल्या प्रकारे सांगितले आहे’, असे जिज्ञासूंनी सांगणे

सौ. प्रतिभा पाटील म्हणाल्या, ‘‘सनातनच्या ‘सण, उत्सव आणि व्रते’ या ग्रंथात दिलेले सर्व शास्त्र किती छान आहे ! आपल्याला थोडीफार माहिती असते; पण ग्रंथातील वाचन केल्यावर संपूर्ण माहिती मिळते.’’ सौ. पाटील यांचे यजमान प्रतिदिन १ घंटा नामजप करतात.

५. ‘नेरुळ येथील सौ. नीता टाक यांनी ‘सण, उत्सव आणि व्रते’ या ग्रंथाचे वाचन केल्यावर त्यातील माहिती त्यांच्या ओळखीच्या लोकांना सांगितली. ग्रंथात सांगितल्याप्रमाणे त्या स्वतः कृती करतात.’

– सौ. विद्यागौरी गुजर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), नेरुळ, नवी मुंबई. (१२.१.२०२२)