मनसेच्या मुंब्रा येथील कार्यालयावर दगडफेक !
‘राजगड’ नावाचा फलक न काढल्याचे प्रकरण
ठाणे, ९ एप्रिल (वार्ता.) – मुंब्रा येथील तन्नवर नगर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून २ दिवसांपूर्वी मनसेच्या वाहतूक सेनेच्या ‘राजगड’ या कार्यालयाला लावलेला पक्षाचा फलक उतरवण्यासाठी रात्री १२ पर्यंतचा कालावधी दिला होता; मात्र फलक न उतरवल्याने ८ एप्रिल या दिवशी मनसेच्या राजगड कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी ही दगडफेक राष्ट्रवादी काँग्रेसने केली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या त्यांच्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना लक्ष्य केले होते. त्यातच ‘मुंब्रा येथील मदरशांमध्ये ईडीने धाडी टाकाव्यात’, असेही ते म्हणाले होते. राज यांच्या भाषणानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ‘राजगड’ नावाचा फलक न काढल्यास आम्ही आमच्या पद्धतीने फलक काढू, मग कोणतीही कारवाई झाली, तरी चालेल’, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अय्याज बबलू यांनी मनसेला दिली होती. याप्रकरणी मुंब्रा येथील मनसेचे वाहतूक शाखा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी मनसे वरिष्ठ पदाधिकारी आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली होती. पोलिसांनीही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सतर्कता दाखवत मनसे वाहतूक शाखा कार्यालयाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त लावला होता.