पुणे येथील पवळे चौकातील शिवलिंगपूजन कार्यक्रमाविषयी नोंदवलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत ! – पतित पावन संघटना
पुणे येथील महाशिवरात्रीनिमित्त आयोजित कार्यक्रमावर झालेल्या कारवाईचे प्रकरण
पुणे – येथील कसबा पेठेतील पवळे चौक येथे महाशिवरात्रीनिमित्त म्हणजे १ मार्च या दिवशी २० फुटांची शंकराची पिंड ठेवून त्याच्या पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी वाहतूक पोलीस, महापालिका यांची अनुमती घेण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार भगवे झेंडे, ध्वनीक्षेपक, माईक, श्रद्धांजली फ्लेक्स काढण्यात आले. कीर्तन, भजन, महाआरती न करण्याच्या अटींचे पालन करूनही पोलिसांनी गुन्हे नोंद केले. त्यामुळे आता हिंदु सण साजरे करायचे कि नाहीत ? हा प्रश्न आमच्यासमोर असून पवळे चौकातील शिवलिंगपूजन कार्यक्रमाविषयी नोंद केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी ‘पतित पावन संघटने’ने पत्रकार परिषदेत केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही पद्धतीने जनआंदोलन करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेत संघटनेकडून सांगण्यात आले की, महाशिवरात्रीला रात्री ८ वाजता १७ जणांना अटक करण्यात आली. ‘स्वत:चा अपराध काय ?’, हेसुद्धा भाविक आणि कार्यकर्ते यांना समजले नाही. दंगलीच्या कलमासह भाषण सभा झालेली नसतांनाही कलम २९५ अ लावण्यात आले. काहींना पहाटे सोडून देण्यात आले, तर दुपारी पसार म्हणून घोषित करण्यात आले. कार्यकर्त्यांचे भ्रमणभाष पोलिसांनी बळजोरीने काढून घेतले. पोलीस कोठडीची मागणीही करण्यात आली. नोटीस नाही, नातेवाइकांना अटक केल्याविषयी माहिती नाही, अशी कमालीची गुप्तता पाळण्यात आली. हिंदूंच्या धार्मिक उत्सवाचे रूपांतर पोलिसांनी तणावग्रस्त वातावरणात केले. पोलिसांनी सांगितलेल्या जागेवर व्यासपीठ टाकून आणि सर्व सूचना पाळूनसुद्धा कारवाई करण्यात आली असून हे चुकीचे आहे. संघटनेचे श्री. स्वप्नील नाईक म्हणाले की, विधीमंडळ अधिवेशनात या घटनेविषयी आमदार सुनील कांबळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर पोलिसांनी ११० ची नोटीस बजावली. पुण्यातील पोलिसांना अवैध धंदे दिसत नाहीत; मात्र हिंदु सण साजरे न करण्यासाठी ४०० ते ५०० पोलीस ठाण मांडून बसतात, हे कशाचे द्योतक आहे ? अभिव्यक्तीस्वातंत्र्याची ही गळचेपी असून राज्यघटनेची पायमल्ली होत असल्याचे चित्र या घटनेमधून दिसत आहे.