वैद्यकीय अभ्यासक्रमास (एम्.बी.बी.एस्.) प्रवेश देतो म्हणून १३ जणांची फसवणूक !
पुणे – महापालिकेच्या नुकत्याच संमती मिळालेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक येथील ‘एस्.एन्.डी.टी.’ वैद्यकीय महाविद्यालय, तसेच राज्यातील वेगवेगळ्या भागांतील वैद्यकीय महाविद्यालये यांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाला (एम्.बी.बी.एस्.) प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने १३ पालकांची अनुमाने अडीच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी विमाननगर येथील चंद्रशेखर देशमुख, राजेंद्र कुशवाह, पारस शर्मा आणि त्यांचे साथीदार यांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नगरमधील नेवासा येथील एका पालकाने याविषयी तक्रार नोंद केली होती. (अशा प्रकारे अवैधरित्या वैद्यकीय आणि अन्य अभ्यासक्रम यांमध्ये प्रवेश मिळवून देणार्यांचे जाळे असण्याची शक्यता आहे. ते शोधून नष्ट करणे आवश्यक आहे. – संपादक)
आरोपींनी विमाननगर परिसरामध्ये ‘शिक्षा सेवा इंडिया’ अशी संस्था चालू केली. याच संस्थेच्या कार्यालयामध्ये तक्रारदारासह अन्य पालकांना बोलावून २० ते ३० लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेतली. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराच्या मुलाला बनावट पत्रही दिले. त्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन चौकशी केली, तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले.