श्रीरामाचा आदर्श घेऊन ‘आदर्श होणे’, हीच खरी ‘श्रीरामपूजा’ ।
आज चैत्र शुक्ल नवमी (१०.४.२०२२) या दिवशी असलेल्या श्रीरामनवमीच्या निमित्ताने…
चैत्र मासातील
शुक्ल नवमी तिथीला ।
प्रभु श्रीरामाचा
जन्म जाहला ।। १ ।।
आदर्श पुत्र, आदर्श बंधू,
मातृ-पितृभक्त राम ।
एकपत्नी, एकवचनी,
मर्यादापुरुषोत्तम श्रीराम ।। २ ।।
आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श शत्रू, आदर्श राजा ।
श्रीरामाचा आदर्श घेऊन ‘आदर्श होणे’,
ही खरी ‘श्रीरामपूजा’ ।। ३ ।।
मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाला कसे भजावे, आठवावे ।
म्या पामराला कळत नाही, कसे स्मरावे, आळवावे ।। ४ ।।
केवळ मूर्तीकडे बघावे, तर तीसुद्धा नाही योग्यता ।
कारण रज-तमाने भरलेली अंतरीची अस्वस्थता ।। ५ ।।
पूजा करण्यास लागती सुंदर, सुगंधित अन् सुकोमल सुमने ।
तन-मन नैवेद्यही तसाच असावा निर्मळ,
निरपेक्ष पूर्णपणे ।। ६ ।।
परंतु खंत वाटते मनाला, आम्ही उणे या सर्व ठिकाणी ।
अपराधांची रानटी फुले ही, कशी वाहू मी श्रीरामचरणी ।। ७ ।।
अश्रूजलांची फुले मात्र नकळत अर्पिली मी चरणी ।
सद्गदित कंठे नतमस्तक होतो प्रभु श्रीरामांच्या चरणी ।। ८ ।।
– आपला कृपाभिलाषी आणि नम्र,
श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ६९ वर्षे), कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (२७.३.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |