मानवी अवयवांची तस्करी करणारी टोळी गोव्यात कार्यरत असल्याची शंका !
भाग्यनगरहून गोव्यात आल्यावर अपहरण करून घायाळ केल्याविषयी एका वाहनचालकाची पोलिसांकडे तक्रार
पणजी, ९ एप्रिल (वार्ता.) आंध्रप्रदेशमधील भाग्यनगरहून (हैद्राबादहून) गोव्यात आलेल्या श्रीनिवास या वाहनचालकाने काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून घायाळ केले असल्याचा दावा केला आहे. हे प्रकरण मानवी अवयवांची तस्करी करणार्या टोळीचे असल्याचा पोलिसांना संशय आल्यावर पोलिसांनी भाग्यनगर येथे जाऊन त्या वाहनचालकाची चौकशी केली. काही अज्ञात व्यक्तींनी आक्रमण करून मला बेशुद्ध केले, असे श्रीनिवास या वाहनचालकाने त्याच्या कुटुंबियांना सांगितले. जेव्हा तो शुद्धीवर आला, तेव्हा त्याच्या डोक्यावर आणि पोटावर टाके घातलेले होते. त्यानंतर असाहाय्य अवस्थेत तो पणजी पोलीस ठाण्यात पोचला. पणजी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी त्याला भोजन दिले आणि तिकिटाचे पैसे देऊन भाग्यनगरला पाठवले. श्रीनिवास हा भाग्यनगर येथील बोराबोंडा भागातील रहिवासी आहे. या बातमीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यानंतर शुक्रवार, ९ एप्रिल या दिवशी गोव्यातील पोलीस चौकशीसाठी सदर वाहनचालक रहात असलेल्या भागातील एस्.आर्. नगर पोलीस ठाण्यात गेले. या प्रकरणी गोवा पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.