श्रीरामाशी संबंधित घेतलेल्या भावप्रयोगांमुळे प्रत्येक कृती श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अर्पण करण्यासाठी प्रयत्न होणे

आज चैत्र शुक्ल नवमी (१०.४.२०२२) या दिवशी असलेल्या श्रीरामनवमीच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. ‘अंगात शक्ती शिल्लक असेपर्यंत आणि अंतिम श्वासापर्यंत देवाच्या कार्यात सहभागी होणे’, हीच देवाची सेवा असल्याचे खारूताईच्या उदाहरणातून जाणवणे

‘आमच्या साधनेच्या आढाव्यात ‘श्रीरामनवमी’च्या निमित्ताने गुढीपाडव्यापासून प्रतिदिन सगळ्यांनी एक भावप्रयोग घेण्याचे ठरवले होते. एकदा सौ. भक्ती कुलकर्णी यांनी ‘रामायणातील रामसेतु निर्माण करतांना खारूताईचा भाव आणि भक्ती’ याविषयी भावप्रयोग घेतला. त्यातून ‘सेवा म्हणजे काय असते ?’, हे मला शिकायला मिळाले. ‘आपल्या अंगात शक्ती असेपर्यंत आणि आपल्या अंतिम श्वासापर्यंत देवाच्या कार्यात सहभागी होणे, ही देवाची सेवा आहे’, हे मला खारूताईकडून शिकायला मिळाले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले जेथे आहेत, तेथे रामराज्य असून साधक आणि साधिका रामभक्त असल्याचे जाणवणे

कु. अंजली कानस्कर

होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी यांनी घेतलेल्या भावप्रयोगातून त्या आम्हा सर्वांना रामराज्यात घेऊन गेल्या. तेव्हा ‘गुरुदेवांना शोधत-शोधत मी रामनाथी आश्रमात आले आहे’, असे मला जाणवले. ताईने घेतलेल्या भावप्रयोगातून पुढे जाणवले की, ‘श्रीरामस्वरूप आपली गुरुमाऊली, म्हणजेच प.पू. डॉक्टरबाबा (परात्पर गुरु डॉ. आठवले) जेथे आहेत, तेथे रामराज्य आहे.’ परात्पर गुरु डॉक्टर स्थुलातून रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आहेत. म्हणजे ‘रामनाथी आश्रम हे रामराज्यच आहे आणि प्रत्येक साधक-साधिका रामभक्त आहेत’, असे मला जाणवले.

३. प्रभूंच्या समोर हनुमानाला स्वतःच्या अस्तित्वाचा थोडाही अहंकार नसल्याचे शिकायला मिळणे

एकदा भावप्रयोग घेत असतांना मी प्रभु श्रीरामचंद्र यांचे दास हनुमानाविषयी भावप्रयोग घेतला. भावप्रयोगाच्या संदर्भातील लिखाण करतांना प्रभु श्रीराम आणि हनुमान यांचे मला सतत स्मरण व्हायचे. हनुमानाची दास्यभक्ती पाहून माझे मन भावविभोर व्हायचे आणि मलाही त्यांच्यासारखीच दास्यभक्ती करण्याची प्रेरणा मिळाली. ‘प्रभूंच्या समोर हनुमानाला स्वतःच्या अस्तित्वाचा थोडाही अहंकार नव्हता’, हे मला हनुमानाकडून शिकायला मिळाले.

भावप्रयोगांमुळे माझा प्रत्येक दिवस राममय होऊन ‘माझी प्रत्येक कृती श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कशी अर्पण होऊ शकते’, यासाठी माझे दिवसभर प्रयत्न होऊ लागले.

‘हे गुरुमाऊली, आपल्या कृपेमुळे ९ दिवसांच्या कालावधीत मला आढाव्यात घेतलेल्या भावप्रयोगांमुळे समर्पणभाव, शरणागतभाव आणि नवविधा भक्तीमध्ये दास्यभक्ती, स्मरणभक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती कशी असायला पाहिजे ?’, हे शिकायला मिळाले. ‘तुम्ही जी शिकवण दिली आहे, ती मला कृतीत आणता येऊ दे. प्रभूचा सेवक बनण्यातील आनंद मला ग्रहण करता येऊ दे आणि प्रभूच्या भक्तीमध्ये मला देहभान विसरून अर्पण होता येऊ दे’, अशी आपल्या चरणी कृतज्ञतारूपी प्रार्थना आहे.’

– कु. अंजली कानस्कर (वय २२ वर्षे), दुर्ग, छत्तीसगड. (२५.४.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक