गोव्यात सुदिन ढवळीकर, निळकंठ हळर्णकर आणि सुभाष फळदेसाई यांना मंत्रीपदाची शपथ

तीनही मंत्र्यांनी घेतली मराठी भाषेतून शपथ

श्री. निळकंठ हळर्णकर

पणजी, ९ एप्रिल (वार्ता.) – गोवा सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करतांना ९ एप्रिलला मगोपचे मडकईचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर, तसेच भाजपचे थिवीचे आमदार श्री. निळकंठ हळर्णकर आणि सांगेचे आमदार श्री. सुभाष फळदेसाई यांना राज्यपालांनी मंत्रीपदाची शपथ दिली. या तिघांनीही मराठी भाषेतून शपथ घेतली. (मातृभाषेतून शपथ घेणार्‍या मंत्र्यांचे अभिनंदन ! – संपादक)

श्री. सुभाष फळदेसाई

राजभवनमधील दुर्भाट सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला. या वेळी भाजपमधील ३ मंत्री वगळता जवळपास सर्व आमदार आणि डिचोलीचे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते. यामुळे सरकारमधील मंत्र्यांची आवश्यक संख्या १२ आता पूर्ण झाली आहे, तसेच श्री. सुदिन ढवळीकर हे फोंडा तालुक्यातील चौथे मंत्री आहेत. नवीन ३ मंत्र्यांना पुढील ४-५ दिवसांत खातेवाटप केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. नवीन मंत्र्यांना खाती देतांना यापूर्वी झालेल्या खातेवाटपात पालट केला जाईल का ? या पत्रकारांच्या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही.

निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच मगोप भाजपला पाठिंबा देईल, याविषयी भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा केली होती !  सुदिन ढवळीकर

पणजी निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच भाजपला पाठिंबा देण्याविषयी भाजपच्या केंद्रातील नेत्यांशी बोलणी केली होती, अशी माहिती श्री. सुदिन ढवळीकर यांनी दिली. मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पोर्तुगीज काळात नष्ट झालेल्या मंदिरांच्या पुनर्उभारणीसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या सरकारच्या निर्णयाविषयी मी समाधानी आहे. ज्या ठिकाणची मंदिरे पाडली गेली त्या मूळ ठिकाणची जागा अजूनही रिकामी असल्यास, त्या ठिकाणी ही प्रक्रिया चालू केली पाहिजे.’’