इम्रान खान यांनी पाक सोडून भारतात निघून जावे ! – विरोधी पक्षाच्या नेत्या मरियम नवाझ

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे कौतुक केल्याचे प्रकरण

विरोधी पक्षाच्या नेत्या मरियम नवाझ आणि पाकचे पंतप्रधान इम्रान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ८ एप्रिल या दिवशी देशाला संबोधित करतांना भारताचे कौतुक केले. त्यावर ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज’ पक्षाच्या नेत्या मरियम नवाझ यांनी इम्रान खान यांना ‘जर तुम्हाला भारत इतकाच आवडत असेल, तर पाकिस्तानमधील सोडून भारतात जा’, असा सल्ला दिला. इम्रान खान त्यांच्या सरकारवरील अविश्‍वासदर्शक ठरावाच्या आदल्या दिवशी त्या बोलत होते.

मरियम नवाझ म्हणाल्या की, खुर्ची जातांना पाहून वेडा झालेल्या या माणसाला कुणीतरी सांगावे की, त्यांना त्यांच्याच पक्षाकडून हटवले जात आहे. भारताचे गुणगान करणार्‍याने हेही जाणून घेतले पाहिजे की, भारतात वेगवेगळ्या पंतप्रधानांविरुद्ध २७ वेळा अविश्‍वासदर्शक प्रस्ताव तेथील संसदेत आणला गेला आहे; मात्र कुणीतरी राज्यघटना, लोकशाही आणि त्याच्या तत्त्वांशी तडजोड केलेली नाही. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एका मताने पराभूत झाल्यानंतर घरी गेले होते. त्यांनी तुमच्या (इम्रान खान) सारखे देश आणि राज्यघटना गहाण ठेवली नव्हती.

भारतातील जनता प्रामाणिक ! – इम्रान खान

इम्रान खान यांनी भारताचे कौतुक करतांना म्हटले होते की, रशियाविषयी स्वतःचे धोरण काय असावे हे भारताला सांगण्याचे धाडस कोणत्याही युरोपियन राजदूतामध्ये नाही. भारतातील जनता खूप प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे.