रा.स्व. संघाची मानहानी केल्याप्रकरणी लेखक आणि प्रकाशक यांना नोटीस !
मुंबई विद्यापिठाच्या पुस्तकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघास ‘अतिरेकी’ म्हटल्याचे प्रकरण
हिंदूंनो, समाजाच्या प्रत्येक अडीअडचणीला धावून जाणाऱ्या संघाची पाठ्यपुस्तकात मानहानी करण्यात येणे, हे साम्यवाद्यांचे छुपे षड्यंत्र असल्याचे जाणा ! – संपादक
मुंबई – मुंबई विद्यापिठाच्या कला शाखेच्या प्रथम वर्षातील राज्यशास्त्राच्या (प्रथम सत्र) पुस्तकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘अतिरेकी’ असे संबोधण्यात आले आहे. या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घाटकोपर विभाग सहकार्यवाह आनंद कदम यांनी अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांच्याद्वारे संबंधित पुस्तकाचे प्रकाशक आणि लेखक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या पुस्तकात ‘इंडियन पोलिटिकल सिस्टम’ आणि ‘इंडियन पोलिटिकल प्रोसेस’ असे २ भाग आहेत. या पुस्तकातील पान क्रमांक १६४ वरील चौथ्या परिच्छेदामध्ये ‘हिंदु संघटनांची भूमिका’ याविषयी केलेल्या लिखाणामध्ये ‘विद्वान हे जातीय दंगलीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या अतिरेकी संस्थेचे वाईट काम म्हणून बघतात’, असे लिहिले आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी चुकीचा संदेश गेला आहे. ‘या पुस्तकाचे प्रकाशक शेठ पब्लिकेशन्स प्रा. लि., तसेच पुस्तकाचे लेखक महेश भागवत, मोनिका वर्मा आणि प्रशांत केळकर यांनी लेखी क्षमा मागून या पुस्तकातील आक्षेपार्ह संदर्भ काढावेत’, अशी मागणी या नोटिसीद्वारे करण्यात आली आहे.