(म्हणे) ‘राज ठाकरे यांना अटक करा !’ – अबू आझमी, समाजवादी पक्ष
मुंबई – राज्यात धार्मिक तेढ वाढवण्याचे काम मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे करत असून त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली आहे. जर तसे झाले नाही, तर मंदिरात हनुमान चालिसा लावा, असा आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. या पार्श्वभूमीवर आझमी बोलत होते. आझमी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी ही मागणी केली.
आझमी म्हणाले, ‘‘राज ठाकरे यांच्या सारख्यांना किंमत नाही. तेच लोक धार्मिक तेढ वाढवत आहेत. त्यामुळे त्यांना अटक करा. राज ठाकरे यांची सभा शांतता क्षेत्रात झाली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी. काही लोक लोकशाहीला धोका निर्माण करत आहेत. नवी मुंबईत सानपाडा येथे एक भूखंड मशिदीसाठी दिला आहे; परंतु स्थानिक नागरिक, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते याला विरोध करत आहे. तेथे अद्याप सुरक्षा दिली जात नाही. याविषयी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही सांगितले आहे.’’