एस्.टी. महामंडळाच्या ‘विठाई’ बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाचे चित्र हटवणार !
|
देवता आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान रोखण्यासाठी शासनाने कठोर कायदा करावा ! – हिंदु जनजागृती समिती
अशाप्रकारे अन्यत्रही जेथे देवता आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान होतो. विविध ठिकाणी ‘टाइल्स’वर असणारी देवतांची चित्रे, चित्रपट, विज्ञापने, नाटके यांतून होणारे देवतांचे विटंबन, मद्याच्या दुकानांना असलेली देवतांची नावे यांतूनही देवतांचा अवमान होतो. हे सर्व प्रकार रोखण्यासाठीही शासनाने कायदा करावा, अशी आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक यांनी म्हटले आहे.
मुंबई, ८ एप्रिल (वार्ता.) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठाई बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाचे चित्र हटवण्याची सूचना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला दिली आहे. एस्.टी. महामंडळाच्या विठाई बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकणे, मळ लागणे असे प्रकार होत असल्यामुळे हिंदु जनजागृती समितीने विठाई बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाचे चित्र हटवण्याची मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती. याला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी वरील सूचना दिली. ५ एप्रिल या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांना पत्र पाठवून एस्.टी. महामंडळाने याविषयीची माहिती दिली.
एस्.टी. परिवहन महामंडळाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘आपण दिलेल्या सूचनेविषयी यापूर्वी समाजातील अन्य काही व्यक्ती आणि संस्था यांच्याकडूनही विठाई बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाचे चित्र काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विठाई बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याविषयीची पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.’ पत्रामध्ये एस्.टी. परिवहन महामंडळाप्रती स्नेह दाखवून दिलेल्या सूचनेविषयी आभारही व्यक्त करण्यात आले आहेत.