संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनो, प्रथम आवाज लावायला शिका !
डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !
पू. किरण फाटक हे डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक आहेत. त्यांचे वडील श्री. भास्करराव फाटक हे घरी संगीताच्या शिकवण्या घेत होते. त्यामुळे पू. किरण फाटक संगीताच्या वातावरणातच लहानाचे मोठे झाले. पुढे त्यांनी बांद्रा (मुंबई) येथील स्व. इंदिराबाई केळकर आणि त्यानंतर पुणे येथील श्री. विकास कशाळकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले.
पू. किरण फाटक हे ‘संगीत अलंकार’ असून गेल्या ३० वर्षांपासून डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे ‘भारतीय संगीत विद्यालया’च्या माध्यमातून मुलांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण देत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी, तसेच अन्य संगीत कार्यक्रमांना त्यांना परीक्षक म्हणून बोलावले जाते. ते श्री स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांना स्वामी समर्थांवर विविध काव्ये आणि भक्तीपर कवने स्फुरली आहेत. आतापर्यंत त्यांचे ४ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी ‘संगीत’ या विषयावर विविध ग्रंथांचे लिखाणही केले आहे. ६.१.२०२० या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. किरण फाटक यांनी संतपद (७१ टक्के आध्यात्मिक पातळी) गाठल्याचे घोषित केले.
‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मौलिक मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी काही लेखांमधून केले आहे. त्यांच्या या लेखांमधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.
– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.३.२०२२)
१. चुकीच्या पद्धतीने आवाज लावण्याची उदाहरणे
१ अ. सहज स्वर न लावता रेकून गाणे : ‘मी परीक्षक म्हणून एका केंद्रावर गेलो होतो. तिथे एक ‘सर’ (संगीत शिकवणारे) शेवटची परीक्षा देण्यासाठी आले होते. परीक्षेला आरंभ झाला. तंबोरे जुळले. तबलजीने तबल्यावर थाप मारली. पहिल्या बड्या ख्यालापूर्वीचा (टीप १) आलाप (टीप २) चालू झाला आणि मी दचकलोच. त्यांनी मान वेळावून आणि गळ्याच्या शिरा ताणून असा काही ‘सा’ लावला की, मला त्यांच्याकडे पहावेना. त्यांचा तोंडवळाही वाकडातिकडा झाला होता. मला ‘रेकणे’ म्हणजे काय ?’, याचा प्रत्यय आला. मी त्यांना प्रेमाने म्हटले, ‘‘सर, आपण इतके कष्ट का घेता ? अगदी सहज असा ‘सा’ लावा.’’ मग मोठ्या कष्टाने त्यांनी सहज असा ‘सा’ लावला; पण ‘पडले वळण इंद्रिया सकला’, या उक्तीप्रमाणे ते पुन्हा रेकून गाऊ लागले. मी ओळखले की, यांना सांगून काही उपयोग नाही. बड्याख्यालानंतर त्यांचा तोंडवळा घामाने डबडबला होता. माझ्या मनात विचार आला, ‘हे सर विद्यार्थ्यांना कसे शिकवत असतील आणि हे या शेवटच्या परीक्षेपर्यंत सुखरूप पोचलेच कसे ?’
टीप १ – शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे संथ लयीत गायले जाणारे बोलगीत.
टीप २ – रागदर्शक स्वरांचा संथ गतीने केलेला विस्तार म्हणजेच ‘आलाप’ होय. स्वरांचा उच्चार केवळ ‘आऽऽऽ’कारात करणे म्हणजे ‘आलाप’.
१ आ. अनुनासिक आवाजात (नाकातून) गाणे : दुसऱ्या एका प्रसंगात एक साधारण चाळीशीच्या बाई (मॅडम) पूर्णपणे अनुनासिक आवाज लावून (नाकातून) गायल्या; पण गायनातील ‘तान’ (टीप ३) या भागाकडे जातांना मात्र त्यांना (अनुनासिक आवाजात) तान घेणे जमेना.
टीप ३ – रागातील स्वरांच्या जलद गतीने केलेल्या विस्तारास ‘तान’, असे म्हणतात.
१ इ. काही जण गातांना तोंड जेमतेम उघडतात. मग त्याला सांगावे लागते, ‘अरे तोंड उघडून गा ! ‘तू काय गातोस ?’, ते ऐकू तरी येऊ दे.’
२. पहिला ‘सा’ लावतांना घ्यावयाची काळजी
‘आवाज लावणे’ ही गायनातली पुष्कळ मोठी शिकण्यासारखी क्रिया असते. ‘पहिला ‘सा’ कसा लावावा ?’, हे शिकवतांना काय काळजी घ्यावी ?’, हे गुरूंनी शिष्याला सांगणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. ‘सा’ लावतांना तोंड किती उघडावे ? श्वास कधी घ्यावा ? कसे बसावे ? तो ‘सा’ किती सेकंद टिकायला हवा ?’, हे सगळे सांगायला हवे.
अ. ‘सा’ गातांना स्वच्छ ‘आ’कार लावावा. ‘आ’ ऐकू येणे महत्त्वाचे आहे.
आ. प्रथम श्वास घ्यावा. नंतर ‘सा’ लावावा.
इ. ताठ बसावे.
ई. ‘सा’ निदान २० ते ३० सेकंद न हालता-डुलता लागायला हवा.
उ. लक्षात असू द्या, ‘जो अस्थिर आहे, तो स्वरच नव्हे.’
या प्रकारे सर्व स्वर लागायला हवेत.
३. ‘आ’कार लावणे
अ. आरंभ करतांना ज्याचा ‘आ’कार बिघडला, ‘त्याचे गायन पूर्ण बिघडले’, असे समजावे.
आ. ‘आ’काराच्या संदर्भात प्रख्यात गायक संगीतकार पंडित यशवंत देव यांनी आपल्या ‘शब्दप्रधान गायकी’ या पुस्तकात छायाचित्रासहित ‘तोंड किती उघडावे ?’, याची फार छान माहिती देऊन ‘आ’काराचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे पुस्तक संगीत शिकणाऱ्या प्रत्येक साधकाने वाचायला हवे.
४. स्वर लावतांना घ्यावयाची काळजी
अ. ‘स्वर लावतांना त्यावर श्वासाचे किती वजन टाकावे ?’, हेही ठाऊक असायला हवे.
आ. ‘स्वराला दाबणे (त्यावर श्वासाचे जास्त वजन टाकणे), स्वर चावणे (गातांना चावण्याची क्रिया करणे), जबडा हालवत गाणे’ टाळले पाहिजे. जबडा हालवत गायल्याने ‘आय, आय’, असा विचित्र ध्वनी उमटतो आणि ते गायन हास्यरसाची उत्पत्ती करते. स्वर सहजगत्या, विशेष कष्ट न घेता आणि श्रवणीय, असे लावता येणे महत्त्वाचे आहे. स्वर लावतांना ‘तोंडवळा वेडावाकडा होणे, डोळे वटारणे, विचित्र हातवारे करणे’, या गोष्टी टाळल्या, तर ते गायन प्रेक्षणीयही होते. श्रोत्यांचे लक्ष पूर्णपणे गाण्याकडेच रहाते.
म्हणून विद्यार्थ्यांनो, प्रथम आवाज लावायला शिका, म्हणजे पुढचा मार्ग पुष्कळच सोपा होईल.’