सैन्यभरतीची सक्ती !

सरकारच्या सैन्यसक्ती योजनेमुळे राष्ट्रकर्तव्य पार पाडण्यासाठी तरुणवर्ग सिद्ध होईल !

‘राष्ट्र’ हा खरेतर प्रत्येक नागरिकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. राष्ट्राचे केले जाणारे गौरवगान पाहून नागरिकांचा ऊर अभिमानाने भरून येतो; कारण ‘राष्ट्र म्हणजे आपण’ असे त्यांना वाटते. ही झाली एक बाजू ! दुसऱ्या बाजूला राष्ट्राशी एकप्रकारची नाळ जोडली गेल्याने राष्ट्रावर होणारा अन्यायही कुणाला सहन होत नाही; पण त्याविषयीचा संताप केवळ निषेधाच्या माध्यमातून व्यक्त होतो. तेही केवळ सामाजिक संकेतस्थळांवरच ! ३-४ दिवस यावर चर्वितचर्वण केले जाते आणि मग तो विषय गुंडाळून एका कोपऱ्यात ठेवला जातो. ‘संपले आपले राष्ट्रकर्तव्य’ या आविर्भावात प्रत्येक जण आपले रहाटगाडगे ओढत असतो. ‘राष्ट्रकर्तव्य खरेतर आयुष्यभरासाठी असते’, हे लक्षात घेऊन ‘प्रतिदिन राष्ट्रासाठी आपला हातभार लागेल, आपल्याकडून राष्ट्रसेवा घडेल’, असे काहीतरी केले पाहिजे; पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज राष्ट्राभिमान असणारी व्यक्तीच दुर्मिळ झाल्याने अशी काही कृती घडेल, याची शक्यताच अल्प असते. जर राष्ट्रप्रेम निर्माण करणारे शिक्षणच दिले गेले नाही, तर राष्ट्राभिमान कसा निर्माण होणार ? त्याही पुढे जाऊन राष्ट्रकर्तव्य पार पाडण्याची सद्बुद्धी तरी कशी होणार ? हे लक्षात घेऊन आता भारत सरकार ३ वर्षे सैन्यात सक्तीची सेवा करण्याची योजना आणण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारची ही योजना नक्कीच दिलासा देणारी आहे. या ३ वर्षांच्या काळात हे तरुण सैनिक नव्हे, तर ‘अग्नीवीर’ या नावाने ओळखले जातील. या अग्नीविरांना सैन्यात कायमही केले जाऊ शकते. देशातील तिन्ही सैन्यदलांनी हा प्रस्ताव सरकारसमोर मांडला होता. त्यामुळे सरकार आणि तिन्ही सैन्यदले यांचे अभिनंदन ! अशा प्रकारे सैन्यात सेवा केल्याने तरुणांमध्ये राष्ट्राभिमान आणि राष्ट्रप्रेम यांची वृद्धी होईल. राष्ट्रसेवा करून राष्ट्रकर्तव्य पार पाडण्यासाठी ते सिद्ध होतील. ३ वर्षांच्या योजनेत राष्ट्राशी संबंधित सर्वच मूल्ये तरुणांमध्ये निर्माण व्हावीत, या दृष्टीने सरकारने सखोल, चिंतनशील आणि कृतीप्रवण करणाऱ्या अभ्यासक्रमाचे आयोजन करायला हवे. सध्याचा तरुणवर्ग पाश्चात्त्य विचारसरणीच्या आहारी जाऊन पैसा, भ्रमणभाष या मोहमायेच्या विश्वात वावरत आहे. त्याला राष्ट्राशी कसलेही देणेघेणे नाही. तरुणांची ही स्थिती लक्षात घेऊन त्यादृष्टीने पूरक आणि महत्त्वाकांक्षी ठरणारी योजना अभ्यासक्रमात राबवायला हवी. तसे झाल्यासच या ३ वर्षांची अपेक्षित आहे अशी फलनिष्पत्ती मिळेल.

तरुणांनो, खरा योद्धा व्हा !

भारतात हे प्रथमच घडत आहे. राष्ट्रासाठीचे हे दालन सरकारने नव्याने तरुणांना उघड करून दिले आहे. आजवर अभ्यासलेला क्रांतीकारक आणि थोर महापुरुष यांचा इतिहास लक्षात घेऊन सैन्य सक्तीच्या योजनेचे तरुणाईने मनापासून स्वागत करायला हवे. मातृभूमीचे रक्षण करणे, हे आपले सन्माननीय कर्तव्य आहे. आयुष्यभर ‘माणूस’ म्हणून रहाणे यात काय विशेष आहे ? यापेक्षा ‘खरा योद्धा’ म्हणून सिद्ध होणे यातच सर्वकाही आले. तरुणांनो, ‘राष्ट्रवाद’ हा राष्ट्रगीत म्हणून किंवा झेंडावंदन करून सिद्ध होत नाही. राष्ट्राशी संबंधित आक्रमणे, अत्याचार, तसेच अन्याय यांचा कणखरपणे सामना केल्यासच राष्ट्रवाद जिवंत राहू शकतो. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतीपुरुषांनी प्राणांचे बलीदान दिले; पण त्याची जाणीव आताच्या पिढीला तसूभरही नाही. त्यांना ते स्वातंत्र्य जणू विनामूल्यच मिळाले आहे. स्वातंत्र्याची जाण निर्माण होण्यासाठी सैन्यभरतीची सक्ती हा उत्तम पर्याय आहे. यातूनच तरुणांचे सशक्तीकरण साध्य होऊन त्यांच्यात कणखरपणा येईल. सैनिक, रणगाडे, बंदुका आणि तोफगोळे या सर्वांशी तरुणांचा काही प्रमाणात का होईना संबंध येऊन त्यांच्यात जाज्वल्य देशाभिमान निर्माण होईल, त्यांना स्फुरण चढेल. अशी तरुणाई भारतासाठी निश्चितच आदर्श असेल. राष्ट्राला सुरक्षा प्रदान करून खऱ्या अर्थाने बळकटी देणे आणि राष्ट्राची पुनर्उभारणी करणे हे तरुणांच्या म्हणजे नव्या पिढीच्या हातात आहे.

विश्वपूरक योजना !

भारत सरकारच्या या योजनेचा विश्वस्तरावरही मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकतो. भारताकडे शत्रूराष्ट्रे वक्र दृष्टीने पहातात. संरक्षण सामर्थ्याच्या दृष्टीने भारत कधीच न्यून पडत नाही, हे खरे आहे; पण आता सैन्यदलात तरुणाईची फौज उतरल्यास सर्वांनाच धडकी भरू शकते. सैन्यदलाची पोलादी भिंतच खऱ्या अर्थाने राष्ट्र घडवून संपूर्ण विश्वात भारताची मोहोर उमटवू शकते. हे झाले तरुणाईचे; पण प्रत्येकच नागरिकाचा यामध्ये वाटा असायला हवा. चिकाटी, स्वयंशिस्त, एकजूट, सांघिक कार्य ही नैतिक मूल्ये शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवीत. सहली, पर्यटन यांसाठी मनोरंजनाच्या ठिकाणी जाण्यापेक्षा वीरश्री जागृत करणाऱ्या सैन्याशी संबंधित असणाऱ्या स्थळांना भेटी द्यायला हव्यात. ‘पहिले राष्ट्र, मग मी’ असा विचार प्रत्येकाने केल्यास संरक्षणदृष्ट्या भारत एकमेवाद्वितीय ठरेल, यात शंका नाही.

इस्रायल, ब्राझील, दक्षिण कोरिया, तुर्की, रशिया, सीरिया, स्वित्झर्लंड, चीन अशा अनेक देशांमध्ये सैन्य भरतीची सक्ती आहे. महान राष्ट्रपुरुषांचा दैदीप्यमान इतिहास लाभलेला भारतच दुर्दैवाने यात मागे होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी चीनसमवेतच्या युद्धाची शक्यता वर्तवून वर्ष १९५९ मध्येच ‘प्रत्येक भारतीय तरुणाला सैनिकी प्रशिक्षण द्या’, असे सांगितले होते; पण राष्ट्रविरांचे ऐकतो कोण ? तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यानंतरचे सर्वपक्षीय शासनकर्ते यांनी सैन्यदलाचे सक्षमीकरण करण्यात आणि सैनिकी प्रशिक्षण देण्यात दुर्लक्ष केले. राष्ट्रवादाला माघार घ्यावी लागली; पण आज भारत सरकारच्या नव्या योजनेमुळे राष्ट्रवादाला पुन्हा एकदा उभारी मिळाली आहे. राष्ट्रप्रेम जागृत ठेवून राष्ट्रसेवा करणाऱ्यांना एवढेच सांगावेसे वाटते की, हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा ।, असे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांसारख्या अनेकांचा वारसा राष्ट्राला लाभला आहे. त्यांचा आदर्श जोपासूया आणि सरकारच्या योजनेद्वारे राष्ट्रकर्तव्य पार पाडूया !