अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील रस्त्याचे ‘गणेश टेंपल स्ट्रीट’ असे नामकरण !

  • कुठे रस्त्यांना हिंदूंच्या देवतांचे नाव देणारे पाश्‍चात्य देश, तर कुठे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांना आक्रमणकारी मोगल आणि इंग्रज यांची नावे देणारा भारत देश ! – संपादक
  • अमेरिकेसारख्या पाश्‍चात्य देशांना हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात आल्याने ते हिंदु संस्कृतीचा गौरव करत आहेत; पण भारतात मात्र आक्रमणकर्त्यांचे उदात्तीकरण केले जाते, हे संतापजनक ! – संपादक

न्यूयॉर्क (अमेरिका) – येथील सुप्रसिद्ध गणेश मंदिराबाहेरील रस्त्याचे ‘गणेश टेंपल स्ट्रीट’ असे नामकरण करण्यात आले असून हिंदु समुदायासाठी ही अभिमानाची गोष्ट मानली जात आहे. उत्तर अमेरिकेतील हिंदु मंदिर सोसायटीच्या योगदानातून हे साध्य झाल्याचे समजते.

१. ‘द हिंदु टेंपल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका श्री महावल्लभ गणपति देवस्थानम्’ म्हणजेच ‘गणेश मंदिर’ या नावाने ओळखले जाणारे हे मंदिर उत्तर अमेरिकेतील पहिले आणि सर्वांत जुने मंदिर म्हणून ओळखले जाते. वर्ष १९७७ मध्ये हे मंदिर उभारण्यात आले होते. हे मंदिर क्विन्स कौंटी येथील फ्लशिंग येथे आहे. या मंदिराबाहेरील रस्ता ‘बाऊन स्ट्रीट’ म्हणून ओळखला जातो.

२. धार्मिक स्वातंत्र्यासाठी लढणारे आणि दासमुक्ती चळवळीचे प्रवर्तक अशी जॉन बाऊन यांची ओळख आहे. आता हा रस्ता ‘बाऊन स्ट्रीट’सह ’गणेश मंदिर मार्ग’ या नावानेही ओळखला जाईल. एका विशेष कार्यक्रमात या मार्गाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला न्यूयॉर्कमधील भारताचे कौन्सिल जनरल रणधीर जैस्वाल, न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अ‍ॅडम्स, न्यूयॉर्कच्या व्यापार आणि गुंतवणूक विभागाचे उपायुक्त दिलीप चौहान आणि भारतीय-अमेरिकी समाजाचे नागरिक उपस्थित होते.