कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होऊन सर्वसामान्यांसाठी एस्.टी.ला पूर्वपदावर आणावे ! – अनिल परब, परिवहनमंत्री
मुंबई – एस्.टी. कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार कामावर रूजू व्हावे. जे कर्मचारी २२ एप्रिलपर्यंत कामावर उपस्थित रहातील, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. एस्.टी. कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू होऊन सर्वसामान्यांसाठी एस्.टी.ला पूर्वपदावर आणावे, असे आवाहन परिवहनमंत्री अनिल परब यांनी एस्.टी.च्या कर्मचाऱ्यांना केले आहे.
एस्.टी. कर्मचाऱ्यांविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना अनिल परब म्हणाले, ‘‘कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाराष्ट्रातील जनतेला, विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना पुष्कळ त्रास सहन करावा लागला आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्या मांडण्याचा पूर्ण हक्क आहे; मात्र महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरून कुठल्याही प्रकारचे आंदोलन करू नका. एस्.टी. महामंडळाची हानी करून आंदोलन चालू ठेवू नका. एस्.टी. कर्मचाऱ्यांची नोकरी जावी, असा कोणताही प्रयत्न आम्ही केलेला नाही; मात्र ७ वेळा आवाहन करूनही कर्मचारी कामावर न आल्यामुळे प्रशासन म्हणून आम्हाला कारवाई करावी लागली. जे कर्मचारी न्यायालयाच्या निर्णयानुसार कामावर उपस्थित रहाणार नाहीत, त्यांच्यावर मात्र कारवाई करण्यात येईल.’’