पोर्तुगिजांच्या काळात नष्ट केलेल्या मंदिरांच्या पुनर्उभारणीला प्रारंभ ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर केलेल्या अत्याचाराच्या खुणा पुसून हिंदु धर्म, संस्कृती यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य शासकीय स्तरावर आरंभ करणारे डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन !
पणजी – पोर्तुगिजांच्या राजवटीत नष्ट करण्यात आलेल्या मंदिरांची पुनर्उभारणी करण्याच्या दृष्टीने गोवा सरकारच्या पुरातत्व विभागाकडून प्रक्रियेला आरंभ करण्यात आला आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली आहे. ते पुढे म्हणाले, ‘‘या वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने मंदिरांची पुनर्उभारणी करण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गोव्यात बऱ्याच ठिकाणची मंदिरे भग्नावस्थेत आणि दुर्लक्षित आहेत. पोर्तुगिजांच्या राजवटीत ही सांस्कृतिक केंद्रे नष्ट करण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयत्न करण्यात आले. गोव्यातील पर्यटन विकास लक्षात घेऊन सरकारने मंदिरांची पुनर्उभारणी करण्याचे ठरवले आहे.’’
गोवा ही देवभूमी !
गोव्यावर ३५० वर्षे पोर्तुगिजांचे राज्य होते. त्यांनी लोकांचे धर्मपरिवर्तन केले. मंदिरे पाडली, संस्कृती नष्ट केली. आम्हाला गोव्याचे जुने वैभव पुनरुज्जीवित करायचे आहे. सुंदर समुद्रकिनारा आणि चर्च यांपुरतीच मर्यादित असलेली गोव्याची आजची प्रतिमा सर्वव्यापी नाही. येथे गावागावांत मोठी मंदिरे आहेत. आमची धार्मिक परंपरा आहे. ती पुनरुज्जीवित करायची आहे. आम्ही गोवा राज्य देशाची पर्यटन राजधानी बनवू; परंतु यामुळे येथील संस्कृतीवर परिणाम होईल, ही शंका निराधार आहे. सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येईल. गोव्यात कॅसिनो असले, तरीही गोवा ही देवभूमी आहे. भारताचे बँकॉक नव्हे, मालदीव करू, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. डॉ. सावंत हे राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. ‘लोकमत’ समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांच्याशी केलेल्या एका संवादात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हे मत व्यक्त केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘आम्ही गोव्याला बँकॉक नव्हे, तर मालदीव करू इच्छितो. भारतातलेच नव्हे, तर जगभरातील लोक मालदीवला जाण्याऐवजी गोव्यात यावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे असलेली ही देवभूमी गोवा भारतीय संस्कृतीचे प्रतीक होईल. मी गुढीपाडव्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या सप्तकोटेश्वर मंदिरात पूजा केली. हिंदु परंपरा पुनरुज्जीवित करणे म्हणजे ख्रिस्ती परंपरा नष्ट करणे नाही. सरकारी निधीतून आम्ही चर्चच्या जतनासाठीही निधी दिलेला आहे; परंतु लुप्त झालेल्या गोमंतकीय संस्कृतीला आम्ही पुनरुज्जीवित करू इच्छितो.’’