सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ४ वर्षे) यांच्या बोलण्यातून त्यांची प्रगल्भता आणि परात्पर गुरुदेवांप्रती असलेला भाव लक्षात येणे
१. पू. भार्गवराम यांना ‘अर्जुन आणि दुर्याेधन यांची महाभारत युद्धाच्या पूर्वी श्रीकृष्णाशी झालेली भेट’ ही गोष्ट सांगतांना अहंभावी दुर्याेधन श्रीकृष्णाच्या उशाजवळ, तर नम्र अर्जुन श्रीकृष्णाच्या चरणांजवळ बसल्याचे सांगणे
महाभारत युद्धापूर्वी अर्जुन आणि दुर्योधन श्रीकृष्णाकडे साहाय्य मागण्यास गेले होते. ही गोष्ट मी पू. भार्गवराम यांना सांगत होते. ‘युद्धापूर्वी प्रथम दुर्याेधन श्रीकृष्णाला भेटायला जातो. त्या वेळी श्रीकृष्ण झोपलेला असतो. ‘त्याला जागे करणे योग्य नाही’, असे वाटून दुर्याेधन तेथील मंचकावर बसतो. ‘मी गो-पालक कृष्णाच्या पायांपाशी कसे बसू ?’ या विचाराने तो श्रीकृष्णाच्या डोक्याच्या जवळ असलेल्या मंचकावर जाऊन बसतो. थोड्या वेळाने अर्जुन श्रीकृष्णाकडे येतो आणि तो श्रीकृष्णाच्या चरणांपाशी बसतो. तेव्हा दुर्याेधनाला वाटत असते, ‘मी प्रथम आलो आहे, तर कृष्णाने माझे म्हणणे पहिल्यांदा ऐकायला पाहिजे आणि युद्धात माझ्या बाजूने रहायला पाहिजे’, तर अर्जुनाला ‘आपल्याला श्रीकृष्णाच्या चरणांशी बसायला मिळाले’, यासाठी कृतज्ञता वाटत होती.
२. श्रीकृष्णाचे लक्ष प्रथम चरणांपाशी बसलेल्या अर्जुनाकडे जाऊन त्याने अर्जुनाशी बोलणे
श्रीकृष्ण जागा होऊन डोळे उघडतो. तेव्हा तो प्रथम चरणांशी बसलेल्या अर्जुनाला पहातो. त्या वेळी श्रीकृष्ण, अर्जुन आणि दुर्याेधन यांच्यात पुढीलप्रमाणे संवाद होतो. श्रीकृष्ण त्याच्या पायाशी बसलेल्या अर्जुनाशी प्रथम बोलतो.
श्रीकृष्ण : तुला काय पाहिजे ?
दुर्याेधन (मध्येच बोलतो) : मी प्रथम आलो आहे.
श्रीकृष्ण : परंतु माझी दृष्टी प्रथम अर्जुनावर पडली.
अर्जुन : मला दुसरे काही नको. केवळ तू माझ्या समवेत पाहिजेस. युद्धात लढण्यासाठी नाही; पण युद्ध करण्यासाठी आम्हाला तुझ्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
अर्जुनाचे नम्रपणाचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण युद्धात अर्जुनासमवेत रहातो.
३. ‘मला परात्पर गुरुदेवांच्या चरणांपाशी बसून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे’, असे प्रगल्भता दर्शवणारे उत्तर देणारे ३ वर्षांचे बालसंत पू. भार्गवराम !
गोष्ट संपल्यावर पू. भार्गवराम आणि त्यांच्या आई सौ. भवानी यांच्यात पुढील संवाद झाला –
सौ. भवानी : तुम्हाला या गोष्टीतून काय शिकायला मिळाले ? तुम्हाला परात्पर गुरुदेवांच्या जवळ कुठे बसायचे आहे ?
पू. भार्गवराम : मला परात्पर गुरुदेवांच्या चरणांपाशी बसायचे आहे.
सौ. भवानी : छान. का बरे ?
पू. भार्गवराम : मला त्यांचा आशीर्वाद पाहिजे ना ! मला सूक्ष्म युद्ध करण्यासाठी परात्पर गुरुदेव शक्ती देतात.
गोष्ट ऐकल्यावर पू. भार्गवराम ‘गोष्टीतील तात्पर्य शिकले’, हे पाहून मला त्यांच्या उच्च विचारांप्रती कृतज्ञता वाटली.
– सौ. भवानी प्रभु, मंगळुरू (७.८.२०२०)