अमरावती येथील भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे यांना ३ मास कारावासाची शिक्षा !
तहसीलदाराला शिवीगाळ केल्याचे प्रकरण
अमरावती – ३० मे २०१६ या दिवशी तहसील कार्यालयात जाऊन वरूड येथील तहसीलदारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे यांना ५ एप्रिल या दिवशी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने ३ मास साध्या कारावासाची शिक्षा आणि १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.
उच्च न्यायालयात दाद मागणार ! – डॉ. अनिल बोंडे
जनतेच्या हितासाठी तहसीलदारांना जाब विचारला होता; मात्र कायद्यानुसार अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या विशेष संरक्षणामुळे ते आमच्यासारख्या समाजकारण आणि राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार देतात. जनतेसाठी केलेल्या कामाची ही शिक्षा मिळाली असून याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असे डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
काय आहे प्रकरण ?संजय गांधी निराधार योजनेत एकूण २४० प्रकरणांमध्ये त्रुटी काढल्यामुळे वरूड येथील नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना जाब विचारण्यासाठी डॉ. अनिल बोंडे हे कार्यकर्त्यांसह दुपारी तहसील कार्यालयात आले होते. या वेळी डॉ. बोंडे यांनी तहसीलदारांना शिवीगाळ करत ‘तुला जिवंत रहायचे नाही का ? तू माझ्या कार्यकर्त्यांचे काम केले नाही’, अशा शब्दांत तहसीलदार काळे यांना धमकावले होते, तसेच कार्यालयातील शासन निर्णयाच्या प्रती आणि शासकीय धारिका फाडून टाकल्या होत्या. या घटनेनंतर काळे यांनी वरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचे अन्वेषण केल्यावर ११ मे २०१७ या दिवशी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट केले होते. |