आज सानपाडा येथे हिंदु वस्तीत मशिदीच्या बांधकामाला दिलेली अनुमती रहित करण्यासाठी हिंदूंकडून उपोषण !
हिंदूबहुल देशात हिंदूंना आंदोलन करून त्यांची न्याय मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून याविषयी पावले का उचलत नाही ? – संपादक
नवी मुंबई – सानपाडा येथे हिंदूबहुल वस्तीत सिडकोने मशिदीला भूखंड देऊन महापालिकेने बांधकाम करण्याची अनुमती दिली आहे. हा निर्णय रहित करण्यासाठी या निर्णयाच्या निषेधार्थ येथील हिंदूंकडून ७ एप्रिल या दिवशी सानपाडा येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि अखिल सानपाडा रहिवासी महासंघ यांच्या वतीने सानपाडा पोलीस ठाण्याच्या समोरील अहिल्यादेवी होळकर चौक, सेक्टर ३ येथे उपोषण करण्यात येणार आहे.
सानपाडा येथे मशिदीसाठी भूखंड मिळावा म्हणून संजिमुल मुसलमान संघटनेने सिडकोकडे मागणी केली होती. त्यावर सिडकोने सेक्टर ८ मधील भूखंड क्रमांक १७ ए हा भूखंड वर्ष १९९८ मध्ये राखीव ठेवला होता. या ठिकाणी भूखंड देण्याविषयी तत्कालीन गृह विभागानेही त्या वेळेस ‘मुसलमानांची लोकसंख्या आणि हिंदूंचा असंतोष’ याचा अहवाल शासनाला दिला होता.
मात्र त्यानंतर स्थानिकांच्या कोणत्याही हरकती न घेता हा भूखंड मशिदीसाठी दिला होता. सिडकोच्या या निर्णयाला अखिल सानपाडा रहिवाशी महासंघाने तीव्र विरोध केला होता. बहुसंख्य हिंदू नागरिकांच्या वसाहतीत सिडकोने मशिदीसाठी भूखंड दिल्याने येथील नागरिकांच्या धार्मिक भावना दुखवल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. हा भूखंड रहित करावा यासाठी येथील रहिवाशांनी सिडकोवर मोर्चा काढला होता, तसेच सहस्रो हिंदूंनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून मुंबई-पुणे महामार्ग बंद केला होता. त्यानंतर या विरोधात संजिमुल मुसलमान संघटना न्यायालयात गेली होती. यावर न्यायालयाने त्यांना हा भूखंड देण्याचे आदेश दिले होते. स्थानिक बहुसंख्य हिंदूंचा विरोध डावलून महापालिकेने न्यायालयाकडे बोट दाखवत मशिदीच्या बांधकामाला अनुमती दिली होती; मात्र असे असले, तरी हिंदूंनी या ठिकाणी त्यांची मागणी कायम ठेवत लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन चालूच ठेवले आहे. आता त्याचाच एक भाग म्हणून हे उपोषण करण्यात येणार आहे. या वेळी उत्स्फूर्तपणे सानपाडा बंद ठेवून सहस्रो रहिवासी उपोषणात सहभागी होणार आहेत.