देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील साधक श्री. कृष्णकुमार जामदार (वय ६९ वर्षे) यांना नामजपाच्या वेळी आलेल्या अनुभूती
मी डिसेंबर २०१९ मध्ये देवद आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करत होतो. तेव्हा मला ३ दिवस वेगवेगळ्या अनुभूती आल्या.
१. नामजपाच्या वेळी ध्यान लागणे आणि निळसर प्रकाशाची वलये डोळ्यांपुढे तरळणे
एकदा मी सकाळी ९.३० वाजता ध्यानमंदिरात नामजप करत असतांना काही वेळाने माझे ध्यान लागले. त्या वेळी माझ्या डोळ्यांपुढे निळसर प्रकाशाची वलये तरळतांना दिसली. ती वलये १ मिनिटाहून अधिक वेळ मला दिसत होती.
२. नामजपाला आरंभ केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले, परात्पर गुरु पांडे महाराज आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे प्रसन्न तोंडवळे डोळ्यांपुढे दिसणे अन् श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र जोरात फिरत असून त्याचा सोनेरी प्रकाश सगळीकडे पसरत असल्याचे जाणवणे
दुसऱ्या दिवशी ध्यानमंदिरात जागा नसल्याने मी दुसरीकडे जाऊन नामजपासाठी बसलो. नामजप आरंभ केल्यावर थोड्या वेळाने माझ्या डोळ्यांसमोर परात्पर गुरु डॉ. आठवले, परात्पर गुरु पांडे महाराज आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे एकापाठोपाठ एक असे प्रसन्न तोंडवळे येऊ लागले. त्यानंतर ‘श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र जोरात फिरत आहे आणि त्याचा सोनेरी प्रकाश सगळीकडे पसरत आहे’, असे मला जाणवले.
३. नामजपाच्या वेळी ध्यान लागून सहस्रारातून गोल वलये बाहेर पडत असल्याचे जाणवणे
एकदा मी नामजप करण्यास आरंभ करून काही मिनिटे झाल्यावर लगेच माझे ध्यान लागले. तेव्हा मला सहस्रारातून गोल वलये बाहेर पडत असल्याचे जाणवले. त्या वलयांतून मला ओघळ येत असल्याचे जाणवले. त्या वेळी मी गालांना हात लावून पाहिले असता मला गालांना ओलसरपणा जाणवला नाही.
– श्री. कृष्णकुमार जामदार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.१२.२०१९)
|