विद्यार्थ्यांनी अध्यात्म आणि अध्ययन यांच्या अभ्यासातून राष्ट्रउभारणीच्या कार्यात मग्न रहावे ! – भगतसिंग कोश्यारी, राज्यपाल
‘श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवना’चा लोकार्पण सोहळा
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – जीवनामध्ये साधना महत्त्वाची आहे. साधना अधिक केल्यास त्याचे योग्य फलित मिळते. आज लोक श्रीमंतांचे नाही, तर संतांचे पाय धरतात; कारण संत साधनेमध्ये मग्न असतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी अध्यात्म आणि अध्ययन यांच्या अभ्यासातून राष्ट्रउभारणीच्या कार्यात मग्न रहावे, असे झाल्यास स्वामी विवेकानंद यांनी भाकित केल्याप्रमाणे २१ व्या शतकात भारत विश्वगुरु बनेल, असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले.
माईर्स एम्.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, तसेच एम्.आय.टी. आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ राजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जगातील सर्वांत मोठे तत्वज्ञ संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर-तुकाराम विश्वशांती घुमटाचे विश्वार्पण अन् श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवनाच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी राज्यपालांच्या हस्ते श्रीमद्भगवद्गीतेच्या सव्वालाख प्रतींचे विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात आले. या वेळी संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, प्राध्यापक डॉ. विश्वनाथ कराड, राहुल कराड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, ‘‘राष्ट्रनिर्मितीसाठी प्राचीन शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांनी आत्मसात् करावे. भगवद्गीतेमध्येही ही शिकवण दिली आहे. त्याच प्रमाणे मानवी जीवनाच्या उन्नत्तीसाठी अध्यात्म आणि विज्ञानाच्या एकत्रीकरणातून शिक्षण प्रदान करावे.’’
या वेळी डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ‘‘अध्यात्मशास्त्राची प्रयोगशाळा जगाला अर्पण करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला साथ देत एम्.आय.टी. ग्रुप श्रीमद्भगवद्गीतेच्या सव्वालाख प्रती वाटप करत आहे.’’