परात्पर गुरुपदावर असूनही स्वतःला प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य संबोधून सतत शिष्यभावात रहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
१. नेहमी शिष्यभावात रहाणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉक्टर सतत शिष्यभावात असतात. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात सनातनची गुरुपरंपरा दर्शवणारी ५ छायाचित्रे (श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद, श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज (प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी) आणि शिष्य डॉ. जयंत आठवले यांची छायाचित्रे लावली आहेत. त्यापैकी परात्पर गुरु डॉक्टर यांच्या छायाचित्राखाली ‘शिष्य डॉ. जयंत बाळाजी आठवले’, असे लिहिले आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या शेवटच्या आजारपणातही त्यांची रात्रंदिवस अत्यंत प्रेमाने, शिष्यभावाने आणि तळमळीने सगुण सेवा केली. तेव्हा ते वेळोवेळी ‘श्री गुरूंच्या सगुण सेवेचे महत्त्व, गुरुसेवेत झालेल्या चुका आणि शिकायला मिळालेली सूत्रे’, अभ्यासवर्गात सांगत असत.
२. प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्योत्तम असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांनी श्री गुरूंच्या आज्ञेनुसार विश्वभर अध्यात्माचा प्रसार करणे आणि ते कार्य प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी अर्पण करणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या आज्ञेप्रमाणे केवळ महाराष्ट्रात किंवा भारतभरच नाही, तर विश्वभर अध्यात्माचा (नामाचा) प्रसार केला. त्यांनी हे सर्व कार्य एखाद्या परम शिष्याप्रमाणे प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी अर्पण केले आणि ते स्वतः नामानिराळे राहिले. ‘सनातनचे आश्रम हे प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) आश्रम आहेत’, असा त्यांचा भाव असल्याने त्यांनी प्रत्येक आश्रमाच्या स्वागतकक्षात प.पू. भक्तराज महाराज यांचे मोठ्या आकारातील छायाचित्र लावले आहे.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे सुंदर नियोजन करून अभूतपूर्व सोहळा घडवून आणणे, त्यासाठी प.पू. भक्तराज महाराज यांनीही आपल्या शिष्योत्तमाचे भरभरून कौतुक करणे
वर्ष १९९५ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी मध्यप्रदेशातील इंदूर येथे प.पू. भक्तराज महाराज यांचा ७५ वा वाढदिवस, म्हणजे ‘अमृत महोत्सव’ साजरा केला. त्यासाठी त्यांनी तहान-भूक विसरून अतोनात कष्ट केले. त्यांनी शिष्यभावात राहून केलेली सेवा पहाण्याचे भाग्य अन्य अनेक साधकांप्रमाणे आम्हालाही (मी आणि माझे यजमान श्री. प्रकाश मराठे यांनाही) मिळाले. ‘असा भव्य-दिव्य आध्यात्मिक सोहळा पुढील ५०० वर्षे होणार नाही’, असे सांगून प.पू. बाबांनी परात्पर गुरु डॉक्टरांचे कौतुक केले होते.
– गुरुचरणी शरणागत,
सौ. शालिनी मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०२१)