डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !
काळानुसार पालटत गेलेला संगीत शिक्षणाचा स्तर, आताच्या संगीत शिक्षणातील समस्या आणि त्यांवरील उपाय !
पू. किरण फाटक हे डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक आहेत. त्यांचे वडील (कै.) भास्करराव फाटक हे घरी संगीताच्या शिकवण्या घेत होते. त्यामुळे पू. किरण फाटक संगीताच्या वातावरणातच लहानाचे मोठे झाले. पुढे त्यांनी बांद्रा (मुंबई) येथील स्व. इंदिराबाई केळकर आणि त्यानंतर पुणे येथील श्री. विकास कशाळकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले.
पू. किरण फाटक हे ‘संगीत अलंकार’ असून गेल्या ३० वर्षांपासून डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथे ‘भारतीय संगीत विद्यालया’च्या माध्यमातून मुलांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण देत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी, तसेच अन्य संगीत कार्यक्रमांना त्यांना परीक्षक म्हणून बोलावले जाते. ते श्री स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांना स्वामी समर्थांवर विविध काव्ये आणि भक्तीपर कवने स्फुरली आहेत. आतापर्यंत त्यांचे ४ काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी ‘संगीत’ या विषयावर विविध ग्रंथांचे लिखाणही केले आहे. ६.१.२०२० या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. किरण फाटक यांनी संतपद (७१ टक्के आध्यात्मिक पातळी) गाठल्याचे घोषित केले.
‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मौलिक मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी काही लेखांमधून केले आहे. त्यांच्या या लेखांमधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.
– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.३.२०२२)
१. २० व्या शतकात पू. किरण फाटक यांचे वडील (कै.) भास्करराव फाटक संगीत शिकवत असतांनाचा संगीत शिक्षणाचा स्तर
१ अ. ‘गुरु-शिष्य’ परंपरेचे काटेकोरपणे पालन करत विद्यार्थ्यांना शिक्षण देणे : ‘तो साधारण १९५८ ते १९७८ चा काळ होता. आमचे वडील (कै.) भास्करराव फाटक हे गायन आणि वादन यांचे वर्ग घेत असत. वडिलांना सतार, दिलरुबा, तबला, हार्माेनियम आणि व्हायोलिन ही वाद्ये वाजवता येत असत. गायन आणि व्हायोलिनवादन हे त्यांच्या शिकवणीचे मुख्य विषय होते. आज जिचा विशेष बोलबाला होत आहे, त्या ‘गुरु-शिष्य’ परंपरेचे आमचे वडील त्या काळी काटेकोरपणे पालन करत असत. त्या काळी आठवड्यातून ३ वेळा एका विद्यार्थ्याची शिकवणी असे.
१ आ. सारख्या आवाजाचे, बुद्धीमत्तेचे आणि वयाचे विद्यार्थी मिळाले, तरच सामूहिक शिकवणी घेणे; अन्यथा एका वेळी एकाच विद्यार्थ्याची शिकवणी घेणे : जर सारख्या आवाजाचे, सारख्या बुद्धीमत्तेचे आणि सारख्या वयाचे विद्यार्थी मिळाले, तरच सामूहिक शिकवणी होत असे. तेव्हा जास्तीत जास्त ३ – ४ विद्यार्थी एकत्र शिकत असत; पण असे फार अभावाने घडत असे; अन्यथा वडील एका वेळी एकाच विद्यार्थ्याची शिकवणी घेत असत. त्या काळी तानपुरा अथवा तबला यांची विद्युत् यंत्रे नव्हती. त्यामुळे विद्यार्थी तानपुरा वाजवत असतांना वडिलांना तबल्यावर ठेका धरावा लागत असे. तबला वाजवून ते ‘बड्या ख्याला’ची (टीप) आवर्तने गायनाने भरत असत. (तबला वाजवत असतांना ते त्या समवेत ख्यालगायनही करत असत.) त्या काळी शिकवणी शुल्क केवळ ५ रुपये होते.
टीप – शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे संथ लयीत गायले जाणारे बोलगीत.
१ इ. सढळ हस्ताने ज्ञानदान करणे आणि गरिबी असूनही अधिक पैसा मिळावा; म्हणून तत्त्वांशी तडजोड न करणे : सांगायचे तात्पर्य असे की, असे ५ – ५ रुपये जमवून आमची आई किराणा मालाचा व्यय (खर्च) भागवत असे. पूर्ण दिवस शिकवल्यावर सुद्धा आमचे वडील कुटुंबाचा प्राथमिक व्यय कसाबसा भागवण्यापुरते पैसे मिळवू शकले; पण ज्ञानदानाच्या संदर्भात त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही कि अधिक पैसा मिळावा; म्हणून तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यांनी अज्ञानी जनांची फसवणूक केली नाही; पण या साऱ्या आदर्शवत् वातावरणात आम्ही मात्र गरिबीचे चटके सहन केले.
२. २१ व्या शतकातील संगीत शिक्षणाचा स्तर, समस्या आणि समस्यांवरील उपाय
अ. प्रश्न असा उरतो की, संगीताचे ज्ञानदान पैसे मिळवण्यासाठी करावे का ? कारण जर कठोर तत्त्वपालन करून शिकवले, तर पैसा दूर जातो आणि तत्त्वे सोडली, तर ज्ञानदानात अडथळा येतो.
आ. आजच्या महागाईच्या काळात एका कुटुंबाचा व्यय न्यूनतम १५ ते २० सहस्र रुपये असतो. प्रामाणिकपणे शिकवून आणि सर्व आदर्श तत्त्वे पाळून एवढे पैसे मिळत नसतील, तर मग संगीत शिक्षकाने काय करावे ?
इ. फार पूर्वी संगीत शिकवणाऱ्या कलाकारांचा चरितार्थ संस्थानिक चालवत असत. आज ती स्थिती उरली नाही. मग या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शिकवणी मूल्यावरच अवलंबून रहावे लागते; म्हणून मग ते जास्तीत जास्त विद्यार्थी शिकवण्यावर भर देतात. यात त्यांना कुठेतरी तत्त्वांशी तडजोड करावी लागते. त्यात ‘परीक्षा’ हा विषय आला. विद्यार्थी परीक्षार्थी होत गेले. आता स्पर्धेचे कार्यक्रम (रिॲलिटी शो) आले, तसेच प्रसारमाध्यमे आली. पैसा आणि प्रसिद्धी विद्यार्थी अन् शिक्षक दोघांच्याही मनात आणि जीवनात घुसली अन् तेथूनच संगीत शिक्षणाचा स्तर घसरत गेला.
याचा अर्थ असा नाही की, तरुण पिढीत चांगले कलाकार घडतच नाहीत. नक्कीच घडतात; कारण अजूनही काही तत्त्वनिष्ठ गुरु आहेत, ज्यांनी ‘संगीत शिक्षण’ हेच आपले जीवित कर्तव्य मानले आहे.
ई. संगीताविषयीचे ज्ञान यू ट्यूब, तसेच फेसबूक यांतून विद्यार्थ्याला सहज उपलब्ध होत आहे. हुशार आणि चाणाक्ष विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ लागले आणि आपल्या प्रगतीत भर घालू लागले; परंतु प्रत्यक्ष विद्यालयीन शिक्षणात मात्र बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांची दिशाभूलच होतांना दिसते.
उ. जर संगीत शिक्षकांना जिल्हा पातळीवर अनुदान, निदान चरितार्थापुरते मानधन, प्रोत्साहन आणि मान दिला, तसेच कार्यक्रम मिळवून दिले, तर नक्कीच शिक्षक आर्थिक विवंचनेतून मुक्त होऊन विद्यार्थांना घडवण्यात व्यग्र रहातील. त्यामुळे कलेचा स्तर (दर्जा) उंचावेल आणि कलेप्रती सामान्य जनांना आदर वाटेल.’
– (पू.) किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (६.६.२०२१)