संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची विशेष अन्वेषण पथकाद्वारे चौकशी करणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी आणि व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथकाची (‘एस्.आय्.टी.’ची) स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ५ एप्रिल या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘अतिरिक्त पोलीस आयुक्त वीरेश प्रभु यांच्या अध्यक्षतेखाली हे विशेष अन्वेषण पथक काम करील. अन्वेषणासाठी त्यांना जेवढा वेळ लागेल, तेवढा देण्यात येईल.’’ संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अंमलबजावणी संचालनालय आणि नवलानी यांनी काही आस्थापनांकडून पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले होते. या प्रकरणी भोसले नावाच्या व्यक्तीने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली होती.