मुसलमानांच्या गटांचा वाद नसल्याने या प्रकरणात वक्फ कायदा लागू होऊ शकत नाही ! – मंदिराच्या अधिवक्त्यांचा युक्तीवाद
काशी विश्वनाथ मंदिराचे प्रकरण
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – काशी विश्वनाथ मंदिर आणि तेथील ज्ञानवापी मशीद यांच्यातील खटल्याच्या सुनावणीच्या वेळी मंदिराच्या अधिवक्त्यांनी ‘या प्रकरणात वक्फ कायदा लागू होऊ शकत नाही; कारण हा वाद हिंदु आणि मुसलमान यांच्यातील आहे. दोन मुसलमान गटांतील नाही’, असे युक्तीवादाच्या वेळी सांगितले. यावर पुढील सुनावणी ८ एप्रिल या दिवशी होणार आहे.
मंदिराचे अधिवक्ता विजय शंकर रस्तोगी यांनी युक्तीवाद करतांना म्हटले की, हा वाद केवळ संपत्तीविषयी नाही, तर कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांशी संबंधित राष्ट्रीय प्रकरण आहे. हे प्रकरण भगवान काशी विश्वेश्वराशी संबंधित आहे. मुसलमान तेथे मशीद असल्याचा दावा करत आहेत.
काय आहे प्रकरण ?
औरंगजेब याने वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर तोडून तेथे ज्ञानवापी मशीद बांधली होती. तेथे मुसलमान ५ वेळा नमाजपठण करतात. वर्ष १९९१ मध्ये दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट करून ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी पूर्वी काशी विश्वेश्वर मंदिर होते आणि तेथे श्रृंगार गौरी पूजा केली जात होती, असे सांगत त्यांच्यावर दावा करण्यात आला होता. मुसलमानांना तेथून हटवून हिंदूंना ती जागा दिली पाहिजे म्हणजे ते तेथे पूजा करू शकतात, अशी यात मागणी करण्यात आली आहे. त्याला अंजुमन इंतेजामिया मशिदीकडून विरोध केला जात आहे. ८ एप्रिल २०२१ या दिवशी न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाकडून या ठिकाणाचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर ९ सप्टेंबर २०२१ या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाने सर्वेक्षणास स्थगिती दिली होती.